‘तारीख पे तारीख’ला छेद, 6 तासात चार्जशीट, 35 दिवसात शिक्षा; कल्याण पोलिसांनी घडवला इतिहास

कल्याण खडकपाडा पोलिसांनी एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात ई-साक्षी प्रणालीचा वापर करून ६ तासांत दोषारोपपत्र दाखल केले. जलदगती न्यायालयाने ३५ दिवसांत आरोपीला १ वर्ष कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली. हे राज्यातील पहिलेच प्रकरण आहे जिथे इतक्या जलदगतीने न्याय मिळाला आहे.

तारीख पे तारीखला छेद, 6 तासात चार्जशीट, 35 दिवसात शिक्षा; कल्याण पोलिसांनी घडवला इतिहास
kalyan police
| Edited By: | Updated on: Jul 09, 2025 | 11:52 PM

एखादे प्रकरण पोलिसात गेले की न्याय मिळायला वर्षानुवर्षे लागतात, अशी ओरड कायमच ऐकायला मिळते. पण कल्याण खडकपाडा पोलिसांनी मात्र हे वाक्य खोटं ठरवलं आहे. एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात पोलिसांनी राज्यात पहिल्यांदाच ई-साक्षी प्रणालीचा वापर करत अवघ्या ६ तासांत दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर जलदगती न्यायालयाने फक्त ३५ दिवसांत आरोपीला शिक्षा सुनावली. या ऐतिहासिक निर्णयामुळे पोलीस आणि न्यायालयाच्या कामगिरीचे कौतुक सर्वत्र होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून रोजी खडकपाडा पोलीस ठाण्यात एका महिलेने २९ वर्षीय ओंकार निकाळजे याच्या विरोधात विनयभंग आणि छेडछाडीची तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळताच, पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी त्याच दिवशी आरोपी ओंकार निकाळजेला अटक केली. या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन तसेच पीडितेला लवकरात लवकर न्याय मिळावा या उद्देशाने पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. ई-साक्षी प्रणालीच्या मदतीने, अवघ्या ६ तासांतच या प्रकरणी दोषारोपपत्र तयार करून ते न्यायालयात दाखल करण्यात आले. यामुळे वेळेची मोठी बचत झाली. तसेच तपासाला गती मिळाली.

१ वर्ष सक्त कारावासाची शिक्षा

कल्याण जलदगती न्यायालयाने या प्रकरणातील सर्व साक्षी-पुरावे तपासले. त्यानंतर, न्यायालयाने आरोपी ओंकार निकाळजे याला दोषी ठरवत बी.एन.एस. कलम ७४ अंतर्गत १ वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच, बी.एन.एस. कलम ३२९ (३) अंतर्गत १ महिना कारावास आणि ५ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. या दंडाच्या रकमेपैकी २,५०० पीडित महिलेला, तर उर्वरित ₹२,५०० सरकारकडे जमा करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. सरकारी पक्षातर्फे अभियोक्ता प्रकाश शालिग्राम सपकाळे यांनी बाजू मांडली.

पीडित महिलेला केवळ ३५ दिवसांत मिळाला न्याय 

या जलद कारवाईबद्दल बोलताना पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सविस्तर माहिती दिली. “राज्यात इतक्या कमी वेळेत विनयभंग प्रकरणातील आरोपीला शिक्षा सुनावण्यात आलेला हा कदाचित पहिलाच खटला असावा.” असे अतुल झेंडे म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने पोलीस दलाच्या कामगिरीचे महत्त्व अधोरेखित होते. कल्याण खडकपाडा पोलीस, जलदगती न्यायालय आणि ई-साक्षी प्रणालीच्या यशस्वी वापरामुळे पीडित महिलेला केवळ ३५ दिवसांत न्याय मिळाला आहे. यामुळे गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.