
कल्याण-शीळ रस्त्यालगत असलेल्या देसाई खाडीत एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला होता. या खळबळजनक प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला होता. आता शिळ डायघर पोलिसांनी अत्यंत जलद गतीने तपास करून अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे. याप्रकरणी श्रीनिवास विश्वकर्मा या नराधम आरोपीला उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथून अटक करण्यात आली आहे. या घटनेबद्दल अनेक धक्कादायक खुलासेही समोर आले आहेत.
दोन दिवसांपूर्वी कल्याणच्या शीळ रोडवर एका सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेह सापडलेल्या तरुणीचे वय 28 ते 30 वर्षे आहे. तिची हत्या करून मृतदेह सुटकेसमध्ये भरून फेकून दिल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास करण्यास सुरुवात केली असता त्यांच्यासमोर धक्कादायक बाबी समोर आल्या. कल्याणच्या शीळ रोडवर मृतदेह सापडलेली ती तरुणी ४ महिन्यांची गर्भवती होती.
खाडीत मृतदेह असलेली सुटकेस आढळल्याची माहिती मिळताच शिळ डायघर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ आणि पीआय राजपूत यांच्या विशेष तपास पथकाने तत्काळ तांत्रिक तपास सुरू केला. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले गेले. या फुटेजमध्ये आरोपी बॅग टाकताना दिसला. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे, पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीची ओळख पटवली. तो उत्तर प्रदेशातील गोरखपूरकडे पळून गेल्याचे माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत, पळून गेलेल्या आरोपी श्रीनिवास विश्वकर्मा याला गोरखपूर येथून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी ५ वर्षांपूर्वी रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागून उदरनिर्वाह करत होती. आरोपी श्रीनिवास विश्वकर्मा तिला आपल्या घरी घेऊन आला होता. गेल्या ५ वर्षात त्याने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. तो लोकांमध्ये आपली प्रतिमा चांगली ठेवण्यासाठी कधी तिला आपली बहीण, कधी मुलगी, तर कधी बायको म्हणून ओळख करून द्यायचा. श्रीनिवास विश्वकर्मा हा या तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करत असल्याने ती गर्भवती राहिली होती.
गर्भधारणेच्या या नाजूक अवस्थेत आरोपी तिच्यावर शारीरिक संबंधांसाठी जबरदस्ती करत होता. मात्र शुक्रवारी तरुणीने शरीर संबंधासाठी नकार दिला. त्यामुळे आरोपी श्रीनिवास विश्वकर्माने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. यानंतर श्रीनिवास विश्वकर्माने पुरावा लपवण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट रचला. त्याने मृत तरुणीचा मृतदेह घरातीलच एका सुटकेसमध्ये कोंबला. यानंतर त्याने ती बॅग घरातच दोन दिवस लपवून ठेवली. त्यानंतर रविवार रात्रीच्या सुमारास तो ही सुटकेस घेऊन कल्याण-शीळ रस्त्यावरील देसाई खाडी परिसरात गेला. तिथे त्याने ती सुटकेस खाडीच्या पाण्यात फेकून दिली.
यानंतर पोलिसांनी वेगवान पद्धतीने या गुन्ह्याचा छडा लावत या गुन्ह्याची उकल करत आरोपीला गजाआड केले आहे. या आरोपीवर खुनासह (IPC कलम ३०२) लैंगिक अत्याचाराचे (IPC कलम ३७६) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.