
पिंपरी – चिंचवड शहरात पुन्हा एकदा एक वैष्णवी हगवणे सारखा हुंडाबळीचा प्रकार घडला आहे. पाच लाख रुपये हुंड्याच्या जाचासाठी तसेच मोटरसायकलच्या घेण्याचा तगादा आणि सततची दारु पिऊन मारहाण या कंटाळलेल्या किरण दामोदर या 26 वर्षांच्या विवाहित महिलेने गळफास घेत स्वत:ला संपवले आहे.
किरणचा पती आशिष दामोदर हा तिला सतत दारू पिऊन शिवीगाळ करीत तिला मारहाण करीत असायचा. तसेच तिला त्याच्या व्यवसायासाठी माहेरहून पाच लाख रुपये आण असा तगादा लावत असल्याने. किरण हीची शेवटी सहनशीलता संपल्याने तिने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणात दुर्देव असे की किरण आपल्या दीड वर्षांच्या बाळाला ( अधीर ) मागे सोडून गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत पुन्हा एकदा वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणासारखी दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे.दारुड्या पतीच्या जाचाला कंटाळून किरण हिने आपल्या चिमुकल्या बाळाला पाठीमागे सोडत 17 जुलैच्या मध्यरात्री बोऱ्हाडेवाडी येथील ए.डी. बॅडमॅन बॅडमिंटन अकॅडमी येथील आपल्या राहत्या घरीत गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. किरणने आत्महत्या करण्यापूर्वी तिचा पती आशिष याने तिला बेदम अमानुष मारहाण केली होती असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
या प्रकरणात दुर्दैवी किरणचे वडील संजय दोंड यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये आशिष दामोदर, त्याची आई सुनंदा दामोदर, वडील दीपक दामोदर यांच्या विरोधात हुंडाबळी कायदा आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमआयडीसी भोसरी पोलिसांनी आशिष दामोदर याला बेड्या देखील ठोकल्या आहेत. तर त्याची आई सुनंदा आणि वडील दीपक याचा शोध पोलीस घेत आहेत.किरणला आत्महत्येस भाग पाडणाऱ्या आशिष दामोदर याच्यावर योग्य कायदेशीर कारवाई करून त्याला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी किरणच्या कुटुंबीयांनी केली आहे.