भयानक, दिवसाढवळ्या काळाचौकी परिसरात तरुणीला चाकूने भोसकलं, तरुणाने स्वत:चा गळा चिरला

मुंबईत आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणीवर भररस्त्यात दिवसाढवळ्या चाकू हल्ला झाला आहे. तो ही एका नर्सिंग होममध्ये. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

भयानक, दिवसाढवळ्या काळाचौकी परिसरात तरुणीला चाकूने भोसकलं, तरुणाने स्वत:चा गळा चिरला
kalachowki area
| Updated on: Oct 24, 2025 | 12:10 PM

मुंबईत आज एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. दिवसाढवळ्या झालेल्या या घटनेने सर्वसामान्यांना हादरवून टाकलं आहे. शुक्रवारी सकाळी काळाचौकी परिसरात दिवसाढवळ्या एक धक्कादायक घटना घडली आहे. भर रस्त्यात एका तरुणाने तरुणीचा पाठलाग करत तिच्यावर चाकू हल्ला केला. आस्था नर्सिंग होम परिसरात ही घटना घडली. सदर तरुणी स्वत:ला वाचवण्यासाठी नर्सिंग होममध्ये शिरली.

आरोपीने तिथेच तिच्यावर हल्ला केला. आरोपीने तरुणीवर चाकू हल्ला केल्यानंतर स्वत:चा गळा चिरुन घेतला. यात त्या तरुणाचा मृत्यू झाला. तरुणी जखमी आहे. या दोघांची ओळख पटवण्याच काम सुरु आहे. तरुणाने हा हल्ला का केला? एकतर्फी प्रेमातून ही घटना घडली आहे का? त्यांच्यात प्रेमसंबंध होते का? या अंगाने तपास सुरु आहे.

सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल

चाकू हल्ल्याची घटना घडली, तिथपासून काही मिनिटांच्या अंतरावर काळाचौकी पोलीस स्टेशन आहे. पोलीस स्टेशनमधील सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तरुण-तरुणींची ओळख पटवण्यासह गुन्ह्यामागचा उद्देश शोधून काढण्याच्या दिशेने तपास सुरु आहे. या घटनेमुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हल्ल्यामागचं प्राथमिक कारण आलं समोर

काळाचौकी परिसरात तरुणीवर हा चाकू हल्ला चारित्र्याच्या संशयावरून झाला. तरुण आणि तरुणी दोघांचे प्रेमसबंध होते. आठ दिवसापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते.तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत सबंध आहेत, असा तरुणाला संशय होता. आज सकाळी भेटायला आल्यानंतर किचन नाईफने तरुणाने तरुणीवर हल्ला केला. तरुणीवर हल्ला केल्यानंतर तरुणाने आपला स्वत:चा गळा चिरून घेत आत्महत्या केली. तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.