Sangamner Police Attack : राज्यात पडसाद, संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला कसा झाला? वाचा सविस्तर

| Updated on: May 07, 2021 | 7:32 PM

हल्ल्याचा घटनाक्रम काय होता, जमाव नेमका कशामुळे आक्रमक झाला आणि हल्ला केला आणि हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई होतेय याचा स्पेशल रिपोर्ट.

Sangamner Police Attack : राज्यात पडसाद, संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला कसा झाला? वाचा सविस्तर
Follow us on

अहमदनगर : एकीकडे कोरोनाने थैमान घातलंय. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशातच बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोरोना नियंत्रणासाठी कडक निर्बंध लावून याची अंमलबजावणी करत आहे. यासाठी पोलीस प्रशासन आणि इतर यंत्रणा आपला जीव धोक्यात घालून गस्त घालत आहेत. मात्र, दुसरीकडे काही नागरिकांचा बेजबाबदारपणाही समोर येत आहे. संगमनेरमध्ये कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच जमावाने हल्ला केलाय. यानंतर राज्यभरात या घटनेची चर्चा झाली. अनेकांना या हल्ल्याचा घटनाक्रम काय होता, जमाव नेमका कशामुळे आक्रमक झाला आणि हल्ला केला आणि हल्ल्यानंतर पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करत आहे याविषयी उत्सुकता आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा स्पेशल रिपोर्ट (Know all about Mob attack on Police in Sangamner Ahmednagar).

संगमनेरमध्ये जमावाचा पोलिसांवर हल्ला, नेमकं काय घडलं?

अहमदनगरमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळेच कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन लागू केलाय. संगमनेरमध्येही कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. गर्दीवर नियंत्रणासाठी जिल्हा मुख्यालयाकडून दंगलविरोधी पथकही संगमनेरमध्ये दाखल झालंय. या पथकांने मागील काही दिवसांपासून शहरात नियमांची कठोर अंमलबजावणी सुरु केलीय. या अंतर्गत वारंवार सूचना देऊनही गर्दी करणाऱ्यांना पोलिसी खाक्याही दाखवला जात आहे. त्यामुळे शहरात नियमांच्या पालनाबाबत जनजागृतीही आली. मात्र, दुसरीकडे पोलिसांच्या कडक कारवाईबद्दल काही घटकांकडून नाराजीही व्यक्त केली जात होती. मात्र, कोरोना नियंत्रणासाठी कडक कारवाई आवश्यक असल्याने संगमनेर पोलिसांनी आपली कारवाई सुरुच ठेवली.

हल्ल्याच्या दिवशी काय घडलं?

गुरुवारी (6 मे) देखील दैनंदिन प्रमाणेच पोलीस पथक शहरात गस्त घालत होतं. जिथं गर्दी दिसेल तिथं थांबून नागरिकांना नियमांचं पालन करण्याची सक्ती करत होतं. सायंकाळी साडेपाच वाजता हे पथक संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात आलं. या ठिकाणी धार्मिक प्रार्थनेसाठी काही नागरिकांनी गर्दी केल्याचं आणि कोरोना नियंत्रणासाठी ठरवून देण्यात आलेल्या नियमांचं उल्लंघन हो असल्याचं लक्षात आलं. या नंतर पोलीस पथकाने या जमावाला गर्दी करु नका, मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं सांगत पोलिसी खाक्या दाखवला. यानंतर तिथं आजूबाजूला उपस्थित असलेल्या नागरिकांनी कारवाईच्या रागातून पोलिसांशी बाचाबाची केली. काही वेळेतच तिथं जमाव तयार झाला आणि पोलिसांवर हल्ला झाला.

हल्ल्यावेळी नेमकं काय झालं?

पोलिसांवरील जमावाच्या हल्ल्याचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात जमावातील अनेकांनी ना मास्क घातला आहे आणि ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलंय. हा जमाव दिल्ली नाका परिसरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करतानाही दिसत आहेत. यावेळी जमावातील नागरिकांनी पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळही केली. सोबतच त्या परिसरात तात्पुरत्या स्वरुपात तयार करण्यात आलेल्या पोलीस चौकीचीही तोडफोड करण्यात आली. जमावाने मारहाण केल्यानंतर यातील एक पोलीस कर्मचारी कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटून आपला जीव वाचवत पळत असतानाही दिसत आहे.

जमावाची बाजू काय?

दिल्ली नाका परिसरातील काही नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी नियमांचं उल्लंघन करणाऱ्या दोन मुलांवर कारवाई केली. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी कारवाई करुन त्यांना सोडून देण्याची मागणी केली. यावरुनच पोलीस आणि जमावात शाब्दिक बाचाबाची झाली. हा सर्व प्रकार सुरु असताना आजूबाजूचे लोकही गोळा झाले आणि जमावातील काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केला, अशी माहिती दिल्ली नाका परिसरातील काही नागरिकांनी दिली.

पोलिसांवरील हल्ल्याप्रकरणी आरोपींची नावं काय?

पोलिसांनी या हल्ल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यात संशयित गुन्हेगार (आरोपी) म्हणून जुबेर हॉटेलवाला, जुबेर हॉटेलचे कर्मचारी, निसार खिचडीवाला, जाकीर खान, मोहम्मद हानिफ रशीद शेख, अरबाज साजिद शेख व इतर अनोळखी 10 ते 15 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.

हल्लेखोरांवर कडक कारवाई करणार : संगमनेर पोलीस निरिक्षक

संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मुकुंदराव देशमुख म्हणाले, “दिल्ली नाका परिसरात काही लोकांनी गर्दी केली होती. गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाने मास्क घाला, सोशल डिस्टन्सिंग पाळा असं सांगितलं. त्यावरुनच जमावाने पोलिसांवर हल्ला केला. याबाबत हल्लेखोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात काही संशयितांचीही नावे आहेत. तपास करुन या आरोपींचा हल्ल्यातील सहभागाची माहिती घेऊन कडक कारवाई केली जाईल. सध्या संगमनेरमधील वातावरण शांत आहे. तणाव निवळण्यासाठी आणि नियमांच्या पालनासाठी स्थानिक नेत्यांच्या बैठका घेण्यात आल्या आहेत.”

टीव्ही 9 मराठीने या प्रकरणाबाबत माहिती घेण्यासाठी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याकडून फोन रिसिव्ह होऊ शकला नाही.

दोषींवर कारवाईसाठी पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य : आमदार सुधीर तांबे

आमदार सुधीर तांबे म्हणाले, “सायंकाळच्या वेळी काही लोक प्रार्थनेसाठी आणि वस्तू खरेदी करण्यासाठी जमले होते. यावेळी पोलिसांनी या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच बाचाबाची झाली. जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात या हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्यात येईल. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आमचं पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य असेल.”

हेही वाचा :

VIDEO: “संचारबंदी असताना गर्दी करण्यास मनाई केली”, संगमनेरमध्ये पोलिसांवर हल्ला, पोलीस चौकीसह गाड्यांची तोडफोड

पुणे पोलीस फरार गजा मारणेच्या शोधात, मालमत्ता जप्तीसह लपण्यास मदत करणाऱ्यांवरही कारवाई होणार

पंजाबमध्ये पोलिसांवर हल्ला, पोलिसाचा हातच कापला, 7 जणांना अटक

व्हिडीओ पाहा :

Know all about Mob attack on Police in Sangamner Ahmednagar