Kalyan Crime : एकट्या महिलांना घेरायचे, मग मारहाण करुन लुटायचे, अखेर पोलिसांनी गाठलेच !

कल्याण-डोंबिवलीत चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. महिला आणि जेष्ठ नागरिकांना टार्गेट करुन लुटण्याचे प्रकार वाढले आहेत.

Kalyan Crime : एकट्या महिलांना घेरायचे, मग मारहाण करुन लुटायचे, अखेर पोलिसांनी गाठलेच !
महिलांना लुटणारी दुकली अटक
| Edited By: | Updated on: Jul 27, 2023 | 3:03 PM

कल्याण / 27 जुलै 2023 : कल्याण-डोंबिवलीत चोऱ्यांचे सत्र थांबतच नाही. एकट्या महिलांना गाठून लुटण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. कोळसेवाडी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. कल्याण पूर्वेला नुकतीच अशी एक घटना घडली होती. बाईकवरुन आलेल्या दोघांनी एका महिलेला एकटी गाठून तिच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून पोबारा केला होता. याप्रकरणी सदर महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. वेगाने तपास करत पोलिसांनी 12 तासात दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. आकाश उर्फ बाबू छोटेलाल पारचे आणि कुमाल रमेश देवडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.

पोलिसांनी 12 तासात दोघांना केली अटक

फिर्यादी श्वेता ओमप्रकाश मिश्रा या कल्याण पूर्व येथून रस्त्यावरुन चालत असताना दोन अनोळखी इसम मोटारसायकलवरुन आले. आरोपींनी श्वेता यांच्या गळ्यातील अडीच तोळे वजनाची सोन्याची चैन खेचून पोबारा केला होता. यानंतर श्वेता मिश्रा यांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत आकाश उर्फ बाबू छोटेलाल पारचे याला शहाड येथून आणि कुमाल रमेश देवडे याला उल्हासनगर येथून अटक केली. आरोपींकडून सोन्याची चैन आणि मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर याआधी 25 गुन्हे दाखल आहेत.