भिंतीवर सुसाईड नोट, कुटुंबातील पाच जणांसह कुत्र्यालाही विष दिलं, आजी-नातीचा मृत्यू

| Updated on: Nov 27, 2021 | 11:13 AM

दिल्लीतील बुराडी कुटुंबातील 11 जणांनी 2019 मध्ये अशाच प्रकारे सामूहिक आत्महत्या केली होती. भोपाळमध्ये जोशी कुटुंबाकडून या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.

भिंतीवर सुसाईड नोट, कुटुंबातील पाच जणांसह कुत्र्यालाही विष दिलं, आजी-नातीचा मृत्यू
भोपाळमधील कुटुंबाची सामूहिक आत्महत्या
Follow us on

Bhopal mass suicide : कर्जबाजारी मेकॅनिकने आपल्या दोन मुली, पत्नी आणि आईसह विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नात मेकॅनिकची एक मुलगी आणि त्याची आई या आजी-नातीचा मृत्यू झाला. तर मेकॅनिक, त्याची पत्नी आणि एक मुलगी अजूनही जीवन-मृत्यूशी झुंज देत आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कुटुंबाने त्यांच्या पाळीव कुत्रा आणि उंदरालाही विषही पाजले.

दिल्लीतील बुरारी कुटुंबातील (Burari Suicide) 11 जणांनी 2019 मध्ये अशाच प्रकारे सामूहिक आत्महत्या केली होती. भोपाळमध्ये जोशी कुटुंबाकडून या घटनेची पुनरावृत्ती झाल्याची चर्चा आहे.

काय आहे प्रकरण?

मध्य प्रदेशातील भोपाळमधील जोशी कुटुंबाने कोल्ड ड्रिंकमध्ये विष मिसळून प्यायल्याचे बोलले जात आहे. मृत्यूपूर्वी कुटुंबियांनी भिंत आणि कागदावर सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात आपल्याला नाईलाजाने हे पाऊल उचललावे लागत असल्याचा उल्लेख केला आहे. तसेच आपल्या डोक्यावर कर्जाचा बोजा असल्याचंही म्हटलं आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी कुटुंबीयांनी व्हिडिओही बनवला होता. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आजी-नातीचा मृत्यू

सीएसपी राकेश श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, जोशी कुटुंब भोपाळमधील आनंद विहारमधील कॉलनीत राहते. त्या कुटुंबातील पाच जणांनी विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्यामध्ये दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. पूर्वी जोशी आणि नंदिनी जोशी अशी मयत महिलांची नावे आहेत. घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटचा तपास करण्यात येत असून, चौकशीअंती कारवाई करण्यात येत आहे.

राहते घर गहाण, देणेकऱ्यांचा तगादा

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सामान्य होती, परंतु आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ते कर्जबाजारी होते. त्यांनी आपले राहते घरही गहाण ठेवले होते, त्यामुळे त्यांना हप्ते फेडण्यात अडचणी येत होत्या. ज्यांच्याकडून पैसे घेतले, ते देणेकरीही वारंवार पैशांची मागणी करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

संबंधित बातम्या :

भंडाऱ्यात शिवसेना पदाधिकाऱ्याची हत्या, घरात घुसून चाकूने सपासप वार