
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 144 वर्षानंतर महाकुंभ मेळा होत आहे. महाशिवरात्रीला अखेरचे पवित्र स्नान घडेल. त्यासाठी लाखोच्या संख्येने भाविक येथे पोहचत आहेत. आतापर्यंतच्या गर्दीने जगातील सर्व मेळाव्याचे उच्चांक मोडीत काढले आहे. कोट्यवधी भाविकांनी येथे पवित्र डुबकी घेतली आहे. इतकी गर्दी आहे की येथे अनेकदा आप्तेष्ठ, नातेवाईकांची ताटातूट झाली आणि ते पुन्हा भेटले पण आहेत. या यात्रेत हवसे, नवसे, गवसेच नाही तर काही अप्पलपोटे त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी आले आहेत. या पवित्र स्थळी या माणसाने असेच कांड केले आहे.
पत्नीला घेऊन आला पवित्र स्नानाला
तर दिल्लीतील ही व्यक्ती पत्नीला त्रिवेणी संगमात मोक्ष प्राप्तीसाठी जायचे म्हणून प्रयागराजला घेऊन आला. दिल्लीमधील त्रिलोकपुरी येथील अशोक कुमार हा त्याची पत्नी मिनाक्षी वाल्मिकी हिला घेऊन कुंभ स्नानसाठी दाखल झाला. मंगळवारी ते दोघे प्रयागराज येथे आले. येथील आझाद नगरात त्यांनी एक रूम भाड्याने घेतली. पण त्यांनी ओळखपत्र का दिले नाही. येथे त्याने पत्नीचा खून केला आणि पोलिसांकडे ती हरवल्याची तक्रार दिली.
दुसर्या दिवशी मिनाक्षी यांचा मृतदेह किरायाने घेतलेल्या रूमधील बाथरूममध्ये सापडला. पोलिसांनी शवविच्छेदनासाठी मृतदेह पाठवला आणि तपास सुरू केला. पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्हीचा शोध घेतला. समाज माध्यमावरील डेटा तपासला.
मुलाला केला फोन आणि हमसून हमसून रडला
अशोक कुमार हा दिल्ली महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत आहे. आरोपीने त्याच्या सोशल मीडिया खात्यावर कुंभ यात्रेचे अनेक फोटो आणि व्हिडिओ अपलोड केले. अर्थात हा त्याच्या योजनेचाच एक भाग होता. त्याने पोलिसांकडे पत्नी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर मुलाला फोन केला आणि त्याची आई हरवल्याची माहिती हमसून हमसून रडून सांगितली.
पण मुलाला वडिलांवर विश्वास बसेना. तो आईचा फोटो घेऊन थेट कुंभमेळ्यात आला. त्याने प्रयागराजला विविध ठिकाणी आईचा शोध घेतला. अखेर तो झुंसी पोलीस ठाण्यात आला. तिथे त्याला त्याच्या आईची हत्या झाल्याचे कळाले.
अवैध संबंधामुळे पत्नीचा काढला काटा
पत्नी हरवल्याची तक्रार देऊन आरोपी प्रयागराज येथेच दडून बसला. पण पोलिसांनी त्याच्या सोशल खात्याच्या माध्यमातून आणि तांत्रिक तपासाआधारे त्याला हेरले. त्याला हिसका दाखवताच अशोक कुमार पोपटासारखा बोलला. त्याचे दुसर्या स्त्रीशी संबंध होते. ही बाब त्याच्या पत्नीला कळाली होती आणि ती या संबंधाच्या आड येत होती. रोजच्या भांडणाला कंटाळून तिचा काटा काढण्याचे त्याने ठरवले होते. महाकुंभ त्यासाठी चांगली संधी असल्याचे त्याच्या लक्षात आले नि त्याने तिचा खून केला. पण मुलामुळे तो अडकला.