एकमेकांचा हात धरुन चौघे तलावात आंघोळीला उतरले, गटांगळ्या खाताना मदतीसाठी आरडाओरड, पण…

| Updated on: Oct 03, 2021 | 12:54 PM

आंघोळीसाठी गेलेल्या चौघा मित्रांपैकी एकाचा करुण अंत झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर परिसरातील नांदोरा झिरी जवळील मुरुम खदानीत घडली आहे. सौरभ राजेंद्र गजभिये (वय 18 वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

एकमेकांचा हात धरुन चौघे तलावात आंघोळीला उतरले, गटांगळ्या खाताना मदतीसाठी आरडाओरड, पण...
भंडाऱ्यात युवकाचा बुडून मृत्यू
Follow us on

तेजस मोहतुरे, टीव्ही 9 मराठी, भंडारा: तलावात आंघोळीसाठी गेलेल्या चौघा मित्रांपैकी एकाचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भंडारा जिल्ह्यात खदानीमध्ये आंघोळीला उतरलेल्या युवकाला जलसमाधी मिळाली. गटांगळ्या खाताना तिघांनी मित्राच्या मदतीसाठी आरडाओरड केली, पण तोपर्यंत युवकाने अखेरचा श्वास घेतला होता.

आंघोळीसाठी गेलेल्या चौघा मित्रांपैकी एकाचा करुण अंत झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या जवाहरनगर परिसरातील नांदोरा झिरी जवळील मुरुम खदानीत घडली आहे. सौरभ राजेंद्र गजभिये (वय 18 वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं?

परसोडी येथील सौरभ गजभिये आणि इतर तिघे मित्र नांदोरा झिरी या पर्यटन स्थळी भटकंती करायला गेले होते. भटकंती करुन परत येत असताना जवाहरनगर ते नांदोरा झिरी या रस्त्यावरील नहरालगत मुरुमाचे उत्खनन करून तयार झालेल्या खोल पाण्यातील लहान तलावात आंघोळीचा मोह आवरता न आल्याने चौघेही मित्र एकमेकांचा हात पकडून खोल पाण्यात आंघोळीसाठी गेले.

मित्राला वाचवण्यासाठी केलेला आरडाओरडा व्यर्थ

दरम्यान अचानक सौरभ खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला. इतर तीन मित्रांनी वाचवण्यासाठी आरडाओरडा सुरु केली. मदतीसाठी नागरिक धावून आले खरे, मात्र तोपर्यंत सौरभचा बुडून मृत्यू झाला. सौरभचा मृतदेह भंडारा सामान्य रुग्णालयात शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेची नोंद जवाहरनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून सौरभच्या दुर्दैवी मृत्यूने परसोडी गावात शोककळा पसरली आहे.

धबधब्याच्या पाण्यात बुडून जळगावात दोघांचा मृत्यू

दुसरीकडे, वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा धबधब्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशाच्या सीमेवर असलेल्या सातपुडा पर्वत रांगेतील बसाली वॉटरफॉल या पर्यटनस्थळी घडली होती. या घटनेत मृत्यू पावलेले दोन्ही तरुण हे जळगावातील रहिवासी होते. दोघांचे मृतदेह दुपारी पाण्यातून बाहेर काढण्यात आले.

उज्ज्वल राजेंद्र पाटील (वय 24, रा. खेडी, ता. जळगाव) आणि जयेश रवींद्र माळी (वय 25, रा. वाघनगर, जळगाव) अशी या घटनेतील मृतांची नावे आहेत. या घटनेत मरण पावलेल्या उज्ज्वल पाटील या तरुणाचा वाढदिवस होता. मात्र दुर्दैवाने वाढदिवशीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जळगाव शहरावर एकच शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या :

नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्दैवी अंत

नदीत पोहण्याचा मोह जीवावर, यवतमाळचे पाच जण नागपुरात बुडाले

बैल धुण्यासाठी मित्रांसोबत गेला, घरी परतलाच नाही, बुलडाण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू

पाय घसरुन लहान भाऊ शेततळ्यात पडला, मोठ्याच्या जीवाचा आटापिटा, भावाला वाचवण्यासाठी त्यानेही उडी मारली, पण…