एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातच आत्महत्या, नगरमध्ये ड्रायव्हरचा बसमागे गळफास

| Updated on: Oct 29, 2021 | 12:57 PM

अहमदनगरमध्ये शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकाळातच आत्महत्या, नगरमध्ये ड्रायव्हरचा बसमागे गळफास
अहमदनगरमध्ये एसटी बस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Follow us on

अहमदनगर : राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संप काळातच एसटी बस चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आली आहे. एसटीच्या मागील बाजूला एसटी ड्रायव्हरने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला.

अहमदनगरमध्ये शेवगाव येथील एसटी चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटी बसला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोण होता मयत एसटी कर्मचारी?

शेवगाव आगारातील दिलीप हरिभाऊ काकडे (वय 50 वर्ष) असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. काकडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा पुण्यात कंपनीमध्ये आहे, तर दुसरा मुलगा संस्थेमध्ये नोकरी करत असून मुलीचे लग्न झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. त्यातच ही आत्महत्या करण्यात आली आहे. मात्र आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच आगराच्या अन्य कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी डेपोत धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोहचले आहेत. ही घटना समजताच मोठी खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत.

एसटी रुळावर आणण्यासाठी सर्व प्रयत्न सुरु – परब

दरम्यान, अहमदनगरमध्ये झालेली एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे, अशी प्रतिक्रिया परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली. याबाबत मी त्यांच्या कुटुंबीयांशी बोललो. मी इतरही कर्मचाऱ्यांना आवाहन करतो, की त्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असंही परब म्हणाले.

दुसरीकडे, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येसाठी सरकार जबाबदार आहे, अशी टीका भाजप आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येची गंभीर दखल घ्या, हे सरकारचं महापाप आहे. सरकारवर गुन्हा दाखल करणार का हा सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, असंही लाड म्हणाले.

संबंधित बातम्या :

एसटी चालकाची बसमध्येच आत्महत्या, बॅगच्या बेल्टने गळफास

पगार न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, एसटी संघटनेकडून आंदोलनाची हाक

घरदार, पोटपाणी जिच्यावर चालत होतं, त्याच एसटीत चालकाचा गळफास, एसटीला गाळातून कोण बाहेर काढणार?