एसटी चालकाची बसमध्येच आत्महत्या, बॅगच्या बेल्टने गळफास

लातूर जिल्ह्यातील उदगीर आगारात एसटी बस थांबलेली असताना एसटी बस चालक संजय केसगिरे यांनी स्वतःकडील बॅगचा बेल्ट काढून त्याच्या सहाय्याने गळफास घेतला.

एसटी चालकाची बसमध्येच आत्महत्या, बॅगच्या बेल्टने गळफास
प्रातिनिधीक फोटो

लातूर : एसटी बस चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्येच्या घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. लातुर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात ही घटना उघडकीस आली आहे. संजय केसगिरे असं आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.

काय आहे प्रकरण?

उदगीर आगारात एसटी बस थांबलेली असताना एसटी बस चालक संजय केसगिरे यांनी स्वतःकडील बॅगचा बेल्ट काढून त्याच्या सहाय्याने गळफास घेतला. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं, मात्र तिथे पोहोचण्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला.

संजय केसगिरे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेले नाही. या घटनेने उदगीर आगारातील कर्मचाऱ्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अहमदनगरमध्ये एसटी ड्रायव्हरची आत्महत्या

याआधीही एसटी बस चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात बसमध्येच ड्रायव्हरने आपलं आयुष्य संपवलं होतं. कर्जबाजारीपणातून त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती.

नेमकं काय घडलं?

संगमनेर बस स्थानकात एसटी बसमध्येच चालकाने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. पाथर्डी-नाशिक बसच्या वाहन चालकाने बसमध्येच गळफास घेतला होता. पाथर्डी बस स्थानकातील चालक सुभाष तेलोरे यांनी आपलं आयुष्य संपवलं होतं. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतल्याचा आरोप झाला होता.

डोक्यावर कर्ज वाढल्याने सुभाष तेलोरे यांनी टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर बस स्थानकात डिझेल नसल्याने नाशिकला न जाता संगमनेरला बस मुक्कामी होती. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच त्यांनी सकाळी गळफास घेतला.

धुळ्यात एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

दुसरीकडे, पगार वेळेवर होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या एसटी (राज्य परिवहन मंडळ) चालकाने नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना धुळे जिल्ह्यातील साक्री इथे घडली. आधीच तुटपुंजा पगार आणि तोही अनियमित असल्यामुळे शेवटी कंटाळून कमलेश बेडसे यांनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते. या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

संबंधित बातम्या :

पगार न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या, एसटी संघटनेकडून आंदोलनाची हाक

घरदार, पोटपाणी जिच्यावर चालत होतं, त्याच एसटीत चालकाचा गळफास, एसटीला गाळातून कोण बाहेर काढणार?

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI