औरंगाबादेत बाईक चोरुन जालन्यात विक्री, अट्टल चोराच्या मुसक्या आवळल्या

| Updated on: Aug 20, 2021 | 7:31 AM

आरोपी आकाश हा औरंगाबाद शहरातील सिडको भागात एम. जी. एम. कॅम्पसमधून मोठ्या शिताफीने दुचाकी वाहन चोरी करायचा आणि चोरी केलेल्या बाईक्स जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकायचा.

औरंगाबादेत बाईक चोरुन जालन्यात विक्री, अट्टल चोराच्या मुसक्या आवळल्या
आरोपी बाईक चोर
Follow us on

औरंगाबाद : औरंगाबाद शहरातून दुचाकी चोरी करुन ती जालना जिल्ह्यात विकणाऱ्या अट्टल दुचाकी चोराच्या मुसक्या गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. आरोपीने शहरातून तब्बल 30 बाईक्स चोरी केल्याची कबुली दिली आहे. आकाश भगवान तांबे (वय 26 वर्ष, रा. मिसरवाडी) असे आरोपीचे नाव आहे.

एम. जी. एम. कॅम्पसमधून दुचाकी चोरी

आरोपी आकाश हा औरंगाबाद शहरातील सिडको भागात एम. जी. एम. कॅम्पसमधून मोठ्या शिताफीने दुचाकी वाहन चोरी करायचा आणि चोरी केलेल्या बाईक्स जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकायचा. अनेक महिन्यांपासून तो अशा चोऱ्या करत असल्याचा आरोप आहे.

सहा चोरीच्या दुचाकी जप्त

आकाशबाबत खबऱ्यांकडून गुन्हे शाखेच्या पथकाला टीप मिळली होती. त्यानंतर पथकाने त्याच्यावर पाळत ठेवत त्याला ताब्यात घेतले. सुरुवातीला आकाश उडवाउडवीची उत्तरे देत होता, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आकाशने तोंड उघडले. त्याच्या ताब्यातून सहा चोरीच्या दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

तीस चोऱ्यांची कबुली

औरंगाबाद शहरात दुचाकी चोरीचे तब्बल 30 गुन्हे केल्याची कबुली आरोपी आकाशने पोलिसांना दिली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला सिडको पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या आरोपीकडून आणखी बरेच गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पंढरपुरात 29 बाईक्स चोरी

दुसरीकडे, राज्य स्तरावर दुचाकींची चोरी करुन विक्री करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात नुकतेच पंढरपूर शहर पोलिसांना यश आले आहे. चार जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून सुमारे 14 लाख रुपये किमतीच्या 29 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. दोन चोर आणि दोघा विक्रेत्यांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

संबंधित बातम्या :

लोकांच्या दुचाकी पळवायचा, पेट्रोल संपलं की तिथेच सोडायचा, चोराचं चोरीचं कारण ऐकून पोलीसही चक्रावले

पुणे ते सोलापूर, चार जिल्ह्यात 14 लाखांच्या 29 बाईक्सची चोरी, मोठ्या टोळीचा पर्दाफाश

यू-ट्यूबवरून चोरीचं प्रशिक्षण, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी ‘रेसिंग बाईक’ची चोरी