प्रसुतीसाठी दाम्पत्य हॉस्पिटलला, चोरट्याची घरफोडी, दोन फेऱ्यात अर्ध-अर्ध सामान नेलं

| Updated on: Sep 12, 2021 | 2:20 PM

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा चोरटा दोन वेळा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पहिल्या वेळेस चोरटा जेव्हा आला होता तेव्हा त्याने पूर्ण शर्ट-पॅन्ट घातली होती. पहिल्या फेरीत त्याने मौल्यवान वस्तू आणि टीव्ही लंपास केला, तर दुसऱ्या वेळेस चोरटा आला तेव्हा त्याने शॉर्ट पॅन्ट आणि टी-शर्ट घातल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे.

प्रसुतीसाठी दाम्पत्य हॉस्पिटलला, चोरट्याची घरफोडी, दोन फेऱ्यात अर्ध-अर्ध सामान नेलं
औरंगाबागेत चोर सीसीटीव्हीत कैद
Follow us on

औरंगाबाद : पत्नीला प्रसुतीकळा येत असल्याने पती- पत्नी दोघेही रुग्णालयात गेले. मात्र हीच संधी साधून चोरट्याने घरातील सोन्याच्या अंगठ्या, रोख रक्कम, लॅपटॉप, टीव्ही, मिक्सर लंपास केले. विशेष म्हणजे एका खेपेत एवढे साहित्य नेता न आल्याने चोरट्याने कपडे बदलून येत पुन्हा त्याच घरातील साहित्य लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार देवळाई परिसरातील कीर्तिका रेसिडेन्सीमध्ये घडला. चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चिकलठाणा पोलीस त्या चोरट्याचा शोध घेत आहेत.

काय आहे प्रकरण?

या घटनेप्रकरणी अधिक माहिती अशी की, कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागात क्लार्क म्हणून कार्यरत असलेले शालीकराम मैनाजी चौधरी (वय-29 वर्ष, रा. कीर्तिका रेसिडेन्सी, देवळाई परिसर) यांच्या पत्नीला प्रसुतीकळा येत असल्याने शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ते रुग्णालयात गेले होते. ते परत संध्याकाळी पाच वाजता घरी आले तेव्हा घराच्या दरवाजाला कुलूप नव्हते आणि दार उघडे होते.

सोन्याच्या अंगठ्या आणि रोकडही लंपास

त्यांनी घरात जाऊन पाहिले असता किचनच्या बेसिन मध्ये कुलूप तुटलेल्या अवस्थेत होते. तर घरातील कपाटातील सर्व साहित्य अस्ताव्यस्त होते. त्यांनी शोकेसमध्ये पाहिले असता त्यामधील एक सात ग्राम वजनाची व एक पाच ग्राम वजनाची सोन्याची अंगठी व सुमारे 80 हजार रुपये रोख असा ऐवज लंपास झाल्याचे निदर्शनास आले.

हॉलमधील स्मार्ट टीव्ही, मिक्सर, लॅपटॉप आणि बॅग असं साहित्य चोरीला गेल्याचे समोर आल्यावर त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. चिकलठाणा पोलिसांच्या पथकाने घटनस्थळाची पाहणी करत श्वान पथकाला पाचारण केले मात्र श्वान काही अंतरावर जाऊन जागेवरच घुटमळला.

चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद

पोलिसांनी इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये दुचाकीवरून आलेला चोरटा स्पष्ट दिसून येत आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

पुन्हा कपडे बदलून आला चोरटा

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली तेव्हा चोरटा दोन वेळा आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. पहिल्या वेळेस चोरटा जेव्हा आला होता तेव्हा त्याने पूर्ण शर्ट-पॅन्ट घातली होती. पहिल्या फेरीत त्याने मौल्यवान वस्तू आणि टीव्ही लंपास केला, तर दुसऱ्या वेळेस चोरटा आला तेव्हा त्याने शॉर्ट पॅन्ट आणि टी-शर्ट घातल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. चोरटा ज्या मोपेडवरून आला होता. त्या वाहनांचा क्रमांक मात्र स्पष्टपणे दिसत नसल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात राहिवाशांमध्ये मात्र मोठी दहशत पसरली आहे.

संबंधित बातम्या :

हातोड्याच्या धाकाने स्कायवॉकवरुन मित्रांना पळवलं, शिर्डीहून आलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

नाशकातील हत्येचं गूढ उकललं, 20 रुपयांसाठी गळा चिरुन मजूराचा खून