पुणे ते सोलापूर, चार जिल्ह्यात 18 लाखांच्या 31 बाईक्सची चोरी, पंढरपुरात रॅकेटचा पर्दाफाश

| Updated on: Sep 29, 2021 | 1:47 PM

पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार असणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चार जिल्ह्यातून एका साथीदाराच्या मदतीने तब्बल 31 मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली.

पुणे ते सोलापूर, चार जिल्ह्यात 18 लाखांच्या 31 बाईक्सची चोरी, पंढरपुरात रॅकेटचा पर्दाफाश
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

पंढरपूर : बाईक चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पंढरपूर शहर पोलिसांनी गजाआड केले. चोरीला गेलेल्या 18 लाख रुपये किंमतीच्या 31 बाईक्सचा शोध लागला असून दोन अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करण्यात आली आहे.

राजू उर्फ गुड्या मधुकर पवार आणि श्रीकांत मलकप्पा नडगिरे (रा. खजुरी, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) या दोघांवर गोपनीय माहितीच्या आधारे पाळत ठेवून त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यानी दिली.

काय आहे प्रकरण?

या दुचाकी सोलापूर, पुणे, सांगली, सातारा या जिल्ह्यातून चोरल्या आहेत. पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात रेकॉर्डवरील गुन्हेगार असणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने चार जिल्ह्यातून एका साथीदाराच्या मदतीने तब्बल 31 मोटर सायकल चोरल्याची कबुली दिली.

बुलेट ते बाईक, 31 मोटर सायकलचा समावेश

यामध्ये एक लाख रुपयांच्या बुलेट पासून ते पन्नास हजार रुपये किमतीच्या मोटरसायकल दोघांनी मिळून चोरल्या होत्या. पुणे येथून 16 मोटरसायकली जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित मोटरसायकल तीन जिल्ह्यात विक्री करण्यात आल्या होत्या. या सर्व 31 मोटर सायकलची किंमत 18 लाख रुपये आहेत. दोन आरोपींना पंढरपूर शहर पोलिसांनी अटक केली असल्याची माहिती पोलिस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली आहे.

पंढरपुरात याआधीही बाईक चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त

याआधी, राज्य स्तरावर दुचाकीची चोरी करुन विक्री करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात पंढरपूर शहर पोलिसांना यश आलं होतं. चार जिल्ह्यातील नऊ तालुक्यांमधून सुमारे 14 लाख रुपये किमतीच्या 29 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या होत्या. दोन चोर आणि दोघा विक्रेत्यांना पोलिसांनी गेल्याच महिन्यात गजाआड केले होते.

पंढरपूर शहर चंद्रभागा बस स्टँड येथे इंदापूर येथून चोरीस गेलेली दुचाकी विक्री केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली. मोटर सायकल चोरी प्रकरणात पोलिसांनी महेश कांतीलाल नवले आणि सिद्धार्थ उर्फ अमर संजय मुसळे यांना अटक केली.

कुठून-कुठून बाईक चोरी?

त्यानंतर पोलिसांकडून टोळीचा भांडाफोड करण्यात आला. या दोघांनी पंढरपूर, इंदापूर, माळशिरस, नातेपुते, अकलूज, यवत, कोथरुड, सांगली, खडक, बारामती अशा ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्या होत्या. त्यांची विक्री करण्याचे काम सदाशिव फरतडे आणि सोमानाथ उर्फ दादा वाघमारे यांनी केले होते.

14 लाखांच्या 29 बाईक्सची चोरी

पंढरपूर पोलिसांनी या चौघांना अटक करून 14 लाख रुपये किमतीच्या 29 मोटारसायकली जप्त करून मोटरसायकलची चोरी व विक्री करणारी राज्यस्तरीय टोळी गजाआड केली.

नागपुरात यूट्यूबवरून चोरीचं प्रशिक्षण

दरम्यान, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी नागपुरात एका अल्पवयीन प्रेमवीराने यूट्यूबवरून चोरीचं प्रशिक्षण घेतलं. आरोपीने साधी-सुधी नव्हे तर थेट ‘रेसिंग बाईक’ची चोरी केली. गेल्या वर्षी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.

संबंधित बातम्या :

यू-ट्यूबवरून चोरीचं प्रशिक्षण, गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी ‘रेसिंग बाईक’ची चोरी

कल्याण-डोंबिवलीत केटीएम बाईकच्या सहाय्याने चोरी, चोरट्याला अटक