
राज्याच्या विविध शहरांत गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि उल्हासनगर या शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जुन्या वादातून होणारे खून, गँगवार आणि सार्वजनिक कार्यक्रमात दहशत माजवण्याचे प्रकार समोर आले आहेत. ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या २४ तासात राज्यात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र हादरला आहे.
जळगावातील कासमवाडी परिसरात समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबांतील जुन्या वादातून एका २७ वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नाना उर्फ ज्ञानेश्वर भिका पाटील असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पाटील आणि जाधव कुटुंबात अनेक वर्षांपासून वाद होता. दसराच्या दिवशी काही कारणांनी तो पुन्हा उफाळून आला. यानंतर जाधव कुटुंबाने नाना पाटील यांच्यावर हल्ला काले. धारदार शस्त्राने पोट, डाव्या मांडीवर आणि शरीरावर एकूण तीन वार केल्याने त्यांचे मूत्रपिंड फाटले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नाशिक शहरातही खुनांचे सत्र सुरुच आहे. मध्यरात्री नाशिक रोड परिसरातील गोरेवाडी भागात कृष्णा ठाकरे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. तीन ते चार जणांनी कृष्णावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याचा निर्घृण खून केला. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र याप्रकरणी नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक शहरात सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे पोलिस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तसेच छत्रपती संभाजीनगर येथे गँगवारमधून सय्यद इम्रान सय्यद शफिक या व्यक्तीची हत्या करण्यात आली. जुन्या गॅस व्यवसायाच्या वादातून मुजीब डॉन या गुंडटोळीने ही घटना घडवली. बुधवारी रात्री ८:३० वाजता रेल्वेस्थानक उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. त्यावेळी इम्रान आपल्या दोन मुलांसोबत रिक्षाने घरी जात होता. यावेळी एका सुसाट कारने रिक्षा अडवून कारमधील पाच ते सहा जणांनी मुलांना बाहेर काढले. यानंतर इम्रानवर शस्त्राने हल्ला चढवला. हल्लेखोरांनी इम्रानची बोटे कापून उजव्या हाताचे मनगट छाटले. त्यानंतर डोकं व मानेवर वार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी सातारा पोलिसांनी अवघ्या नऊ तासांत मुख्य संशयित मुजीब डॉनसह त्याचा सख्खा भाऊ सद्दाम हुसैन मोईनोद्दीन आणि आतेभाऊ शेख इरफान शेख सुलेमान या तिघांना झाल्टा फाटा येथे अटक केली आहे.