
नवी दिल्ली : सध्या देशभरातील क्रिकेटप्रेमींच्या डोक्यावर इंडियन प्रीमियर लीगची क्रेझ (IPL)आहे. प्रत्येकजण फोनवर किंवा टीव्हीवर आयपीएल मॅच पाहण्यात दंग असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, दिल्लीत याच आयपीएलच्या नावावर दोन तरूणींची फसवणूक (fraud) झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू असल्याचे भासवून एका व्यक्तीने दोन मुलींची 13 लाख रुपयांचा चुना (13 lakh rupees) लावला. रणजी ट्रॉफीमध्ये निवड करून देण्याचे तसेच सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत आरोपीने त्या दोघींना फसवले.
हे गंभीर प्रकरण पूर्व दिल्लीतील प्रीत विहारचे आहे. या प्रकरणी पोलिसांनी 24 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. गगन शर्मा असे आरोपीचे नाव असून तो बुलंदशहरच्या करोरा गावचा रहिवासी आहे. आरोपी गगनने दोन मैत्रिणींपैकी एकीला रणजी ट्रॉफीमध्ये निवड करून देण्याचे आश्वासन दिले. तर दुसऱ्या तरूणीला
सरकारी नोकरी मिळवून देण्याचे वचन दिले. या बहाण्याने त्याने दोघींकडून तब्बल 13 लाख रुपये उकळत त्या दोघीची फसवणूक केली आहे.
स्वाती आणि अनन्या या दोघी जवळच्या मैत्रिणी असून स्वातीला क्रिकेटची आवड आहे तर अनया ही सरकारी नोकरीच्या शोधात होती. या गोष्टींचा गैरफायदा घेत गगनने त्या दोघींनीही फसवत 13 लाखांचा गंडा घातला.
क्रिकेटच्या प्रेमापायी फसली तरूणी
स्वाती आणि अनन्या या दोघीही एक दिवस पार्कमध्ये फिरत होत्या. तिथे गगन काही मुलांना क्रिकेटचे प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी पाहिले. हे पाहून त्या दोघीजणी त्याच्याशी बोलायला गेल्या. तेव्हा गगनने स्वत:ची ओळख करून देताना तो राजस्थान रॉयल्स संघाचा खेळाडू असल्याचे सांगितले. हे ऐकून स्वाती खूप प्रभावित झाली. आरोपीने स्वातीला रणजी करंडक मध्ये खेळण्याची संधी मिळू शकते असे सांगितले. हे ऐकून स्वाती खूप खूश झाली आणि त्याच्या बोलण्यात गुंतत गेली.
एवढेच नाही तर स्वातीचा विश्वास संपादन करण्यासाठी गगनने तिला क्रिकेट मॅच खेळण्याच्या बहाण्याने धरमशाला येथे नेले पण तेथे न खेळवताच तिला दिल्लीला परत आणले. तसेच, अनन्याची दिशाभूल करण्यासाठी त्याने तिला सांगितले की त्याची बहीण दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश आहे, तर त्याचे वडील दिल्लीतील एका पोलीस ठाण्यात एसएचओ आहेत.
बँकेत नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र दिले
अनन्या सरकारी नोकरीच्या शोधात होती. ते जोखून गगनने तिला काळजी करू नकोस, त्याला सरकारी बँकेत नोकरी लावून देतो, असे आश्वासन दिले. त्यानंतर आरोपीने स्वातीला मुंबईला नेले आणि तिची ओळख एका मैत्रिणीशी करून दिली आणि तिला बनावट नियुक्तीपत्र मिळवून दिले. आरोपींनी दोघी मैत्रिणींकडून 13 लाख रुपये उकळले, पण दोघींपैकी कोणाचेच काम झालेच नाही.
पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. गगनचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे, त्याला क्रिकेटची आवड आहे, तो क्रिकेट शिकण्यासाठी दिल्लीत आला होता आणि केवळ मौजमजेसाठी त्याने फसवणूक केल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले.