ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करण्यास आलेल्या वधूवर त्याने झाडली गोळी, कारण ऐकून व्हाल हैराण

ज्या पिस्तुलाने हा गोळीबार करण्यात आला आहे, पोलिसांनी ते जप्त केले आहे. हल्ल्यानंतर आरोपीने त्याचा स्वत:चा जीव घेण्याचाही प्रयत्न केल्याचे समजते.

ब्युटी पार्लरमध्ये मेकअप करण्यास आलेल्या वधूवर त्याने झाडली गोळी, कारण ऐकून व्हाल हैराण
| Updated on: May 23, 2023 | 4:23 PM

मुंगेर : बिहारच्या मुंगेर येथे पार्लरमध्ये प्री-वेडिंग मेक-अपसाठी गेलेल्या नववधूवर एका इसमाने गोळ्या (man shot bride in parlour) झाडल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे या प्रकरणी पोलिसांनी 22 तासांत आरोपी तरुणाला अटक केली. डीएसपी राजेश कुमार यांनी सांगितले की, गोळीबार करणाऱ्या तरुणाला सोमवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली. आरोपी हा बिहार पोलीस हवालदार असून तो पाटणा येथील दंगल नियंत्रण पथकात तैनात आहे. आरोपी अमन कुमार हा 2021 च्या बॅचचा शिपाई आहे. घटनेनंतर लगेचच पोलीसांनी तत्काळ तपास सुरू केला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

डीएसपी सदर राजेश कुमार यांनी सांगितले की, ज्या पिस्तूलने ही गोळी झाडण्यात आली तेही जप्त करण्यात आले असून ते अवैध शस्त्र मुंगेरमध्ये बनवले जाते. पोलिसांनी सांगितले की, ही घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचे समोर आले आहे. पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. डीएसपीने सांगितले की, जावेद हबीब हेअर कटिंग सलूनमध्ये गोळीबार करणारा कॉन्स्टेबल अमन कुमार गौरव, जो 25 वर्षांचा आहे आणि 2021 च्या बॅचचा आहे. सध्या तो पाटणा पोलिसात तैनात असून दंगल नियंत्रण पथक बटालियनमध्ये आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे समजते.

अमनने 18 मे रोजी पाटणा सोडले. चौकशीदरम्यान अमनने पोलिसांना सांगितले की, त्याने दोन दिवस वधू अपूर्वला भेटण्याचा प्रयत्न केला, पण तिला भेटता आले नाही. यानंतर ती ब्युटी पार्लरमध्ये गेल्याचे मला कळले. मीही तेथे गेलो आणि पार्लरमध्ये पोहोचल्यानंतर गोळीबार केला. अमनने असेही सांगितले की हे शस्त्र अनेक दिवसांपासून घरात ठेवले होते . यामध्ये इतर आणखी कोणत्याही व्यक्तीचा सहभाग नसल्याचेही त्याने स्पष्ट केले. तो माझा स्वतःचा निर्णय होता, असेही त्याने स्पष्ट केले.

आरोपीच्या अटकेने वधूच्या कुटुंबीयांना थोडा दिलासा मिळाला, तर दुसरीकडे अपूर्वावर अद्याप खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपूर्वा अजूनही आयसीयूमध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. मागून मारलेली गोळी छाती भेदून फाडून बाहेर आल्याचे उपचार करणारे डॉक्टरांनी सांगितले. तिच्या प्रकृतीला अद्याप धोका कायम आहे.