
राजस्थानमधील कोटा शहरात एका 29 वर्षीय तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. रात्री कोटा-बुंदी रोडवरील एका हॉस्टेलमध्ये तो इसम एका महिला मैत्रिणीसोबत राहायला गेला. रात्री तो झोपला पण सकाळी जेव्हा त्याच्या मैत्रिणीने त्याला उठवायचा प्रयत्न केला, तेव्हा तो बेशुद्धावस्थेत आढळला. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं, पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.
मृताचे नाव भंवर सिंग राजपूत असे आहे, तो कोटा शहरातील दादाबारी भागातील रहिवासी आहे असं नांता पोलिस स्टेशनचे प्रभारी नवल किशोर शर्मा यांनी सांगितलं. रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास तो एका महिला मैत्रिणीसह कोटा-बुंदी रोडवरील एका हॉस्टेलवर आला आणि खोली बुक केली. दोघांनीही तिथेच रात्र घालवली. सकाळी जेव्हा ती महिला उठली तेव्हा तिने भंवर सिंगला उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही, त्याला जागही आली नाही. घाबरलेल्या महिलेने हॉस्टलेच्या व्यवस्थापनाला माहिती दिली, त्यानंतर त्या तरुणाला एमबीएस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
रात्री दारू प्यायल्याचा दावा
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेने चौकशीदरम्यान सांगितले की, भंवर सिंहने रात्री दारू प्यायली होती. त्यानंतर दोघेही झोपी गेले. सकाळी त्याला उठवल्यानंतर तो जराही हलला नाही तेव्हा तिला काहीतरी गंभीर घडल्याचा संशय आला आणि तिने ताबडतोब मदतीसाठी हाक मारली. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणी अहवाल आल्यानंतरच डॉक्टरांची टीम अंतिम कारण निश्चित करेल. सध्या, पोलिस सर्व शक्य दृष्टिकोनातून प्रकरणाचा तपास करत आहेत.
या घटनेसंदर्भात बीएनएसएसच्या कलम 194 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे असं नांता पोलिस स्टेशनचे प्रभारी नवल किशोर शर्मा म्हणाले. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाईल, मृतासोबत त्या खोलीत राहिलेल्या महिलेची सविस्तर चौकशी केली जात आहे आणि तिचे म्हणणे लेखी स्वरूपात नोंदवण्यात आले आहे असंही त्यांनी सांगितलं.
मृत्यू ठरला चर्चेचा विषय
ही घटना कोटा शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. एका तरुण, आपल्या महिला मैत्रिणीसोबत राहिला पण दुसऱ्या दिवशी सकाळी मृतावस्थेत आढळल्याने लोकांमध्ये अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. विशेषतः दादाबारी परिसरात, जिथे मृताचे घर आहे, या बातमीने सर्वांना धक्का बसला आहे.
या मृत्यूप्रकरणी सध्या सर्व पैलूंचा विचार केला जात आहे. दारू पिण्याचा शरीरावर होणारा परिणाम, अचानक कोणताही आजार उद्भवणे किंवा इतर कोणतेही कारण या सर्वांचा तपास केला जात आहे असं पोलिसांनी सांगितलं. यासाठी वसतिगृहातील सीसीटीव्ही फुटेज, खोलीतून जप्त केलेल्या वस्तू आणि घटनास्थळी सापडलेले पुरावे यांची तपासणी केली जात आहे.
हॉस्टेलमधील कर्मचाऱ्यांच्या सांगण्यानुसार, भंवर सिंग आणि ती महिला रविवारी रात्री 9 च्या सुमारास आले आणि ते सामान्यपणे बोलत होते. त्यांनी बाहेरून जेवण मागवले आणि नंतर त्यांच्या खोलीत गेले. कर्मचाऱ्यांना रात्री कोणचाही वाद किंवा वेगळा आवाज ऐकू आला नाही.
मेडिकल बोर्डाकडून करण्यात येणारी पोस्टमॉर्टेम प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूमागील खरे कारण समोर येईल. हा अहवाल तपासासाठी महत्त्वाचा ठरेल आणि मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे की त्यात काही संशयास्पद बाब आहे हे स्पष्ट होईल, असे पोलिसांचे मत आहे.
मृताच्या कुटुंबाला शोक अनावर
मृताच्या कुटुंबाला घटनेची माहिती मिळताच कोटा शहरातील दादाबारी परिसरात शोककळा पसरली. कुटुंब या धक्क्यातून सावरू शकलेले नाही. पोलिसांनी लोकांना कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नयेत आणि तपास पूर्ण होईपर्यंत धीर धरण्याचे आवाहन केले आहे.