एअरपोर्टवर एक बॅग उघडताच त्यात 47 विषारी साप; सुरक्षा रक्षकही हादरले

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून 47 विषारी साप आणि कासवं जप्त केली आहेत. या प्रवाशाला पोलिसांनी अटक केली असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.

एअरपोर्टवर एक बॅग उघडताच त्यात 47 विषारी साप; सुरक्षा रक्षकही हादरले
जप्त केलेले साप
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 03, 2025 | 11:44 AM

विमानतळावर तपासणीदरम्यान प्रवाशांकडून सोनं आणि इतर महागड्या वस्तू जप्त केल्या जातात हे आपण अनेकदा ऐकतो आणि पाहतो. परंतु मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक विचित्र दृश्य पहायला मिळालं. विमानतळावर सीमाशुल्क तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून चक्क 47 विषारी साप आणि पाच कासवं जप्त केली आहेत. प्रवाशाकडे इतक्या मोठ्या संख्येने साप पाहून सुरक्षा कर्मचारीही हादरले. हा प्रवासी थायलंडहून भारतात परतला होता. त्याने बँकॉकहून भारतात येण्यासाठी विमानाने प्रवास केला होता. याप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका भारतीय प्रवाशाकडे 47 विषारी साप आणि पाच कासवं आढळून आली. अधिकाऱ्यांना संबंधित प्रवाशाबद्दल संशय आला होता. त्यानंतर त्यांनी त्याला थांबवलं आणि त्याच्या बॅगेची तपासणी केली. या तपासणीदरम्यान त्यांना विषारी साप आणि कासवं आढळून आली. RAW (रेस्क्विंक असोसिएशन फॉर वाइल्ड लाइफ वेलफेअर) पथकाने या साप आणि कासवांच्या प्रजाती ओळखण्यास मदत केल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. हे साप आणि कासव वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत पुन्हा त्या देशात परत पाठवले जातील. याप्रकरणी प्रवाशाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जात आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशाच्या चेक-इन बॅगमध्ये सापडलेल्या साप आणि कासवांमध्ये तीन स्पायडर टेल्ड हॉर्नड वायपर, पाच एशियन लीफ टर्टल आणि 44 इंडोनेशियन पिट वायपर यांचा समावेश होता. भारतातील विविध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत त्यांना जप्त करण्यात आलं आहे. प्रवाशाने इतक्या संख्येने साप आणि कासव नेमके कुठून आणले, याबाबती माहिती त्यांनी दिली नाही. भारतात संरक्षित किंवा लुप्तप्राय प्रजातींच्या आयातीवर बंदी आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर जप्त केलेल्या सापांचे फोटो शेअर केले आहेत.