पालांडे आणि कुंदनला पाच दिवसांची कोठडी, अनिल देशमुखांवर ईडीच्या वकिलांचे गंभीर आरोप, दिवसभरात काय-काय घडलं?

| Updated on: Jun 26, 2021 | 9:06 PM

अनिल देशमुख हे चौकशीला हजर न झाल्याने आता ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांना दुसरं समन्स पाठवण्याच्या तयारीत आहेत (Anil Deshmukh secretary and PA remanded to ED custody till July 1).

पालांडे आणि कुंदनला पाच दिवसांची कोठडी, अनिल देशमुखांवर ईडीच्या वकिलांचे गंभीर आरोप, दिवसभरात काय-काय घडलं?
अनिल देशमुख, माजी गृहमंत्री
Follow us on

मुंबई : ईडीने शनिवारी (25 जून) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. यानंतर काल दुपारी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यांची 10 तास चौकशी केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता दोघांना अटक करण्यात आली. यानंतर अनिल देशमुख यांना तात्काळ चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहीले नाहीत. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितली. अनिल देशमुख हे चौकशीला हजर न झाल्याने आता ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांना दुसरं समन्स पाठवण्याच्या तयारीत आहेत. येत्या एक-दोन दिवसात हे समन्स पाठवलं जाईल आणि पुढच्या आठवड्यात त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे (Anil Deshmukh secretary and PA remanded to ED custody till July 1).

सेशन कोर्टाच्या सुनावणीत काय-काय घडलं?

ईडीने अटकेत असलेले संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा रिमांड मिळावा यासाठी त्यांना आज कोर्टात हजर केलं. मुंबई सेशन कोर्टातील न्यायमूर्ती डॉ यु. एल. मोरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आरोपी संजीव पालांडे यांची बाजू वकील शेखर जगताप तर कुंदन शिंदे यांची बाजू वकील अभिजीत सावंत आणि मेहूल ठक्कर यांनी मांडली. तर ईडीच्यावतीने सुनील गोंसावलीस यांनी युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने दोघांना 1 जुलैपर्यंत ईडी कोठडी दिली (Anil Deshmukh secretary and PA remanded to ED custody till July 1).

कोर्टात सरकारी वकिलांनी काय बाजू मांडली ?

“हायकोर्टात तीन जनहित याचिका दाखल झाल्या आहेत. या याचिकेवर दिलेल्या आदेशावर सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. PMLA ACT 50 नुसार अनिल देशमुख यांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. सीबीआयने दाखल केलेल्या FIR अंतर्गत इडीने ECR रजिस्टर केला आहे. ईडीचा ECR हे सार्वजनिक कागदपत्रे नसतात. ECR दाखल केल्यानंतर आम्ही चौकशी करता आरोपींना समन्स केलं होतं. संजीव पालांडे हा अनिल देशमुख यांचा स्वीय सहाय्यक आहे. तर कुंदन शिंदे हा अनिल देशमुख यांचा असिस्टंट आहे. बार मालकांकडून पैसे गोळा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे”, अशी बाजू ईडीच्या वकिलांनी मांडली.

“सचिन वाझेने डिसेंबर महिन्यात 40 लाख रुपये गुडलक म्हणून संजीव पालांडेला दिले होते. सचिन वाझे याने मुंबईतून 4 कोटी 80 लाख रुपये वसुली करुन गोळा केले होते. मुंबईतील 60 बार मालकांना रात्री उशिरापर्यंत बार सुरू ठेवण्यासाठी हे पैसे गोळा करण्यात आले होते. जया शेट्टी आणि महेश शेट्टी या बार मालकांनी त्यांच्या जबाबात तसं म्हटलं आहे. सचिन वाझेने त्याच्या जबाबात याचा उल्लेख केला आहे. सचिन वाझेला चांगली पोस्टिंग याच करता दिली होती का? याची चौकशी करायची आहे”, अशी माहिती ईडीच्या वकिलांनी दिली.

“कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना PMLA ACT अंतर्गत अटक केली आहे. त्यांची अजून चौकशी करणे बाकी आहे. पैशांचे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले आहेत. या प्रकरणी आणखी लोकांचा सहभाग असल्याचा संशय आहे. याबाबत चौकशी करायची आहे”, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला.

पालांडे आणि शिंदे यांच्या वकिलांचा युक्तीवाद नेमका काय?

संजीव पालांडे यांचे वकील शेखर जगताप यांनीही युक्तिवाद केला. “आमच्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. ईडीने त्यांच्या रिमांडमध्ये आमचा नेमका काय गुन्हा आहे ते देखील नमूद केलेलं नाही. हेतू पुरस्पर आम्हाला यात गुंतवल गेलं आहे. 100 कोटी रुपयांचा हा मोठा स्कॅम असल्याचे हे भासवले जात आहे. 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली गाडी पार्क करण्यात आली होती. ती सचिन वाझेने पार्क केली होती. या प्रकरणी NIA ने त्याला अटक केली आहे”, असं वकील शेखर जगताप म्हणाले.

“अटकेच्या आधी सचिन वाझे याने व्हाट्सपअॅप स्टेटसवर ठेवले होते की, त्याच्याच पोलिसांनी त्याला पुन्हा एकदा फसवलं आहे. सचिन वाझेच्या नियुक्तीला तत्कालीन सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांनी विरोध केला होता. सचिन वाझे आणि टीमच्या कारनाम्यांमुळे परमबीर सिंग यांना माहिती होत ते अडचणीत येणार आणि मग आपल्यावर कारवाई होणार हे लक्षात येताच परमबीर सिंग यांनी हे आरोप केले आहे”, असा दावा त्यांनी केला.

संबंधित बातम्या :

बार, पबमधून कोट्यवधींची वसूली, प्रत्येक झोनमधून सचिन वाझेला पैसे, नंतर ते अनिल देशमुखांकडे, ईडीच्या वकिलांचा कोर्टात मोठा दावा

पालांडे डील करायचे, कुंदन कॅश स्वीकारायचा, देशमुखांच्या PA वर आरोप, ED पुन्हा समन्स पाठवणार