हनुमान चालीसा प्रकरण, आरोपातून दोषमुक्तीकरीता राणा दाम्पत्याचा न्यायालयात अर्ज

राणा दाम्पत्य आरोपी असलेल्या हनुमान चालीसा प्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान राणा यांचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी दोषमुक्तीसाठी कोर्टात अर्ज दाखल केला.

हनुमान चालीसा प्रकरण, आरोपातून दोषमुक्तीकरीता राणा दाम्पत्याचा न्यायालयात अर्ज
नवनीत राणा, रवी राणा
Image Credit source: google
| Edited By: | Updated on: Jan 10, 2023 | 2:20 PM

मुंबई : हनुमान चालीसा प्रकरणातील आरोपातून दोषमुक्त करण्यासाठी राणा दाम्पत्यातर्फे मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात हनुमान चालीसा प्रकरणात खार पोलिसांनी गुन्हा केला होता. दाखल केलेल्या गुन्ह्यातून आरोप मुक्तीसाठी आज मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात हा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र या अर्जावर सरकारी वकिलांना उत्तर दाखल करण्याचे कोर्टाने निर्देश दिले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी 2 फेब्रुवारीला होणार आहे.

राणा दाम्पत्य आरोपी असलेल्या हनुमान चालीसा प्रकरणी आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान राणा यांचे वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी दोषमुक्तीसाठी कोर्टात अर्ज दाखल केला.

न्यायालयाकडून 2 फेब्रुवारी रोजी उत्तर दाखल करण्याचे आदेश

विशेष म्हणजे एफआयआर दाखल नसताना कलम 353 नुसार पोलीस राणा दाम्पत्याला अटक कसे करू शकतात ? असा सवाल अॅड. मार्चन्ट यांनी उपस्थिती केला. मात्र ही तांत्रिक चूक पोलिसांचा हलगर्जीपणा आहे की जाणूनबुजून केलेली चूक आहे ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी विशेष पीएमएलए कोर्टानं सरकारी वकिलांना या प्रकरणात 2 फेब्रुवारीला आपले उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रकरण काय आहे ?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती.

राणा दाम्पत्याच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले होते. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले. दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला.

राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शने केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.

तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता. त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्याने आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी जाणार नसल्याचे राणा दाम्पत्याने व्हिडीओ जारी करत सांगितले आणि या नाट्यावर पडदा पडला.

पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले गेले.

न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यांच्या जामीन अर्जावर तातडीची सुनावणी नामंजूर करत 29 एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.