
Kalyan Crime Vishal Gawali: कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार मागील वर्षी डिसेंबर महिन्यात घडला होता. या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा तळोजा कारागृहात होता. त्याने कारागृहात गळफास घेत रविवारी पहाटे आत्महत्या केली. त्यानंतर त्याचे वकील संजय धनके यांनी मोठा आरोप केला आहे. संजय धनके म्हटले की, विशाल गवळी आत्महत्या केली नसेल त्याला मारले गेले असेल. अक्षय शिंदे सारखे त्याला देखील मारले गेले असेल, असा आरोप त्यांनी केला.
कल्याण अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने तळोजा कारागृहामध्ये पहाटे साडेतीन वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. तो पहाटे साडेतीन वाजता टॉयलेटला गेला होता. त्यावेळी टॉवेलच्या सहाय्याने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली. त्याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, पीडित मुलीचे वकील नीरज कुमार यांनी सांगितले की, आरोपी विशाल गवळी याला न्यायालयाच्या माध्यमातून कठोर शिक्षा झाली पाहिजे होती. त्याला फाशी व्हावी, यासाठी आमचे प्रयत्न देखील सुरू होते. मात्र त्याने आत्महत्या केली तरी एका प्रकारे आम्हाला न्याय मिळाला आहे. त्याला फाशी झाली असती तर अत्याचारासारखे कृत्य करणाऱ्यांवर कायद्याची दहशत राहिली असती. त्याने आत्महत्या जरी केली तरी आम्हाला न्याय मिळाला, असे वाटत आहे.
विशाल गवळी हा कल्याणमधील कुप्रसिद्ध गुंड होता. त्याच्या अनेक गुन्हे दाखल आहे. त्यात बलात्कार करणे, बलात्काराचा प्रयत्न, छेड काढणे, लहान मुलांचे लैंगिक शोषण असे गुन्हे होते. त्याची तीन लग्न झाली आहेत. त्याच्या दोन बायका त्याला सोडून गेल्या आहेत. तर तिसरी बायको एका खाजगी बँकेत नोकरीला होती. त्याने २३ डिसेंबर २०२४ रोजी कल्याणमधील कोळसेवाडी भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून त्याच्या घरी आणले होते. त्यानंतर त्याने त्याच्या घरात त्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. हा खटला जलदगती न्यायालयात सुरु होता.