नवी मुंबईत फळ मार्केटमध्ये गाडीत स्फोट, एकाला अटक, दुसरा आरोपी रुग्णालयात

| Updated on: Jul 06, 2021 | 11:16 AM

अटक करण्यात आलेला आरोपी आवास खानची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तर गाडीत स्फोट घडवून फरार झालेला आरोपी रुग्णालयात दाखल आहे. एमएच 43 एडी 7598 क्रमांकाच्या आयशर गाडीत हा स्फोट झाला होता

नवी मुंबईत फळ मार्केटमध्ये गाडीत स्फोट, एकाला अटक, दुसरा आरोपी रुग्णालयात
नवी मुंबईच्या फळ मार्केटमध्ये आयशर गाडीत स्फोट
Follow us on

नवी मुंबई : मुंबई एपीएमसी फळ मार्केटमधील गाडीत झालेल्या स्फोट प्रकरणात एपीएमसी पोलिसांनी एकाला अटक केली आहे, तर एक जण रुग्णालयात दाखल आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळ मार्केटच्या बहुउद्देशीय इमारतीच्या खाली शुक्रवारी रात्री दोन वाजता स्फोट झाला होता. (Navi Mumbai APMC Fruit Market eicher car blast one arrested)

अटक करण्यात आलेला आरोपी आवास खानची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तर गाडीत स्फोट घडवून फरार झालेला आरोपी रुग्णालयात दाखल आहे. एमएच 43 एडी 7598 क्रमांकाच्या आयशर गाडीत हा स्फोट झाला होता. एपीएमसी फळ मार्केटमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्ही बंद असल्यामुळे पोलिसांना आरोपींचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या. या निमित्ताने मार्केटच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

काय घडलं होतं

गाडीच्या मागील भागाच्या पूर्ण चिंधड्या उडाल्या होत्या, तर जवळपास 25 ते 30 फूट अंतरावर असलेल्या कार्यालयाच्या काचा तडकल्या होत्या. यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी स्फोटाचा आवाज एवढा भयंकर होता, की काही वेळ काय घडले याचा अंदाज बांधणंही कठीण झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं. परिसरात अनेक गाड्या पार्क करण्यात आल्या होत्या. परंतु वेळीच अग्निशमन दलाची गाडी आल्याने पुढील दुर्घटना टळली. गाडीत स्फोटक ठेऊन गाडी उडवण्यात आल्याचा आरोप गाडीचे चालक राजीव कुमार यादव यांनी केला.

स्फोट घडवून आणल्याचा गाडी चालकाचा दावा

मुंबई एपीएमसी फळ मार्केटमध्ये राजीव कुमार यादव ही व्यक्ती अब्बास नामक व्यक्तीकडे कामाला होती. त्याने काही दिवसांपूर्वी अब्बासकडून गाडी विकत घेतल्याचे सांगण्यात येत आहे. गाडीचे पूर्ण पैसे अब्बास यांना देऊनही त्यांनी गाडी माझ्या नावावर केली नसल्याचं राजीव कुमार यादव या गाडी चालकाने सांगितलं. तर अब्बास आणि गाडी चालकामध्ये गेल्या काही दिवसांपासून कुर्ला येथील माल वाहतुकीवरून वाद असल्याचं समजतं.

साडे सात लाख रुपयात अब्बास यांनी यादव यांना गाडी विकली होती. एक वर्षभरापूर्वी अब्बास यांचा मुलगा रमझान याने गाडीच्या काचा फोडून चालकाला मारहाण केली होती, अशी माहिती मिळतेय. दरम्यान, त्या दिवशी चालकाने दुपारी 4 वाजता गाडी मार्केटमध्ये उभी केली होती. रात्री दोन वाजता फोन आला की गाडी जळत आहे. मी येईपर्यंत गाडी पूर्ण जाळून खाक झाली होती. तर बॅटरी, इंजिन आणि इतर पार्टस गाडीचे शाबूत असल्याने हि घटना शॉटसर्किट मुळे घडली नाही तर ती उडवून देण्याचा प्रयत्न झाल्याचं यादवने सांगितलं. गाडीवर बांधण्यात आलेली ताडपत्री व नायलॉन रस्सी जवळपास तीस फूट उंच उडून जाऊन पडली होती.

संबंधित बातम्या :

नवी मुंबईतील फळमार्केटमध्ये एका गाडीत भीषण स्फोट, परिसरात भीतीचं वातावरण

(Navi Mumbai APMC Fruit Market eicher car blast one arrested)