Mumbai NCB Raid: आर्यन खानचे वकील एनसीबीच्या कार्यालयात, सरकारी वकीलही पोहोचले, आता कोर्टात काय घडणार?

Aryan Khan | आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या बचावासाठी दोन वकील मुंबईच्या बॅलार्ड पियर येथील अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे सरकारी वकील अद्वैत सक्सेनाही याठिकाणी पोहोचले आहेत.

Mumbai NCB Raid: आर्यन खानचे वकील एनसीबीच्या कार्यालयात, सरकारी वकीलही पोहोचले, आता कोर्टात काय घडणार?
आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात
| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 12:42 PM

मुंबई: ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. आज सकाळपासून माध्यमविश्वात या हायप्रोफाईल केसची चर्चा रंगली आहे. एनसीबीकडून आर्यन खानची कसून चौकशी करण्यात आली आहे. थोड्याचवेळात त्याला न्यायालयात हजर केले जाईल. त्यावेळी एनसीबीकडून काय सांगण्यात येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान, आर्यन खान याला एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्याच्या बचावासाठी दोन वकील मुंबईच्या बॅलार्ड पियर येथील अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे सरकारी वकील अद्वैत सक्सेनाही याठिकाणी पोहोचले आहेत. त्यामुळे आता एनसीबी आर्यन खानला त्याच्या वकिलांशी बोलून देणार का थेट न्यायालयात दोन्ही पक्षांमध्ये युक्तिवाद रंगणार, हे पाहावे लागेल. एनसीबी आर्यन खानच्या कोठडीची मागणी करणार का, हे पाहावे लागेल. आर्यन खानची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार का पोलीस कोठडीत, हेदेखील पाहावे लागेल.  आर्यन खानला पोलीस कोठडी सुनावली गेल्यास त्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

आर्यन खानसह आठ जणांना एनसीबीने ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये अरबाझ मर्चंट, मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर आणि गोमित चोप्रा यांचा समावेश आहे.

एनसीबीने रात्रभर या सगळ्यांची कसून चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले आहेत. आता थोड्याचवेळात या सगळ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली जाईल. त्यानंतर आर्यन खानसह आठ जणांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना किला कोर्टात हजर करण्यात येईल. प्राथमिक माहितीनुसार, रेव्ह पार्टीवर धाड टाकण्यात आली तेव्हा आर्यन खान त्याठिकाणी उपस्थित होता. याठिकाणी एमडी, कोकेन आणि चरसचा मोठा साठा मिळाला. त्यामुळे आता न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शाहरुख खान दुबईत बिझी

आर्यन खानला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर सगळ्यांचे लक्ष शाहरूख खान काय प्रतिक्रिया देणार, याकडे लागले होते. शाहरुख खानची प्रतिक्रिया घेण्यासाठी अनेकांनी धावाधावही सुरु केली. मात्र, शाहरूख खान सध्या दुबईत असल्याची माहिती समोर आली आहे. दुबईत सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. शाहरुख खान हा आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाचा मालक आहे. ही स्पर्धा सध्या रोमांचक वळणावर उभी आहे. त्यामुळेच शाहरूख सध्या दुबईत असल्याचे कळते. दरम्यान, आर्यन खानवरील कारवाईनंतर पोलिसांचे कोणतेही पथक अद्याप शाहरूख खानच्या घरी गेलेले नाही. त्यामुळे आता शाहरुख खान मुंबईत कधी परतणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या :

आर्यन खानला मुंबईत अटक, पण शाहरुख खान दुबईत, जाणून घ्या कारण?

मुंबईत नार्कोटिक्स ब्युरोची मोठी कारवाई; क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड, बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक?

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव