पैशांचं आमीष देऊन धर्मांतरासाठी उकसावण्याचा प्रकार! पालघरच्या डहाणूमधून चौघेजण पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Aug 06, 2022 | 1:04 PM

Palghar Crime News : धर्मांतर करण्यासाठी सांगणाऱ्या चौघांकडेही सावटा या गावामधील काही आदिवासी कुटुंबांतील प्रमुखांची नावं आढळून आली.

पैशांचं आमीष देऊन धर्मांतरासाठी उकसावण्याचा प्रकार! पालघरच्या डहाणूमधून चौघेजण पोलिसांच्या ताब्यात
धक्कादायक प्रकार उघडकीस
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

पालघर : पालघरमध्ये (Palghar Crime News) चक्क पैशांचा आमीष दाखवून आदिवासी गरजू कुटुंबांना धर्मांतरासाठी उकसावण्याचा प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी पोलिसांनी चौघा जणांना ताब्यात घेतलं. तसंच त्यांच्याविरोधात गुन्हा देखील नोंदवण्यात आला आहे. डहाणू पोलिसांनी याप्रकरणी कारवाई केली आहे. स्थानिक तरुणांनी या संपूर्ण प्रकार उघडकीस आणलाय. डहाणूतल्या (Dahanu News) सावटा येथील काही आदिवासी कुटुंबांना पैशांचं लालच दाखवत त्यांना धर्मांतर करण्यासाठी उकसावलं जात होतं. ही बाबत निदर्शनास आल्यानंतर काही तरुणांनी याप्रकरणाची दखल घेतली आणि धर्मांतर करण्यासाठी उकसावणाऱ्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलंय. याप्रकरणी पोलिसांनी कलन 153, 295, 448 आणि 34 प्रमाणे गुन्हा दाखल करुन घेतला आहे. याप्रकरणी डहाणू पोलिसांकडून (Dahanu Police) चौघांवर गुन्हा नोंदवून घेत आता त्यांची कसून चौकशी केली जातेय.

लिफाफे आणि पैशांसह पर्दाफाश

धर्मांतर करण्यासाठी सांगणाऱ्या चौघांकडेही सावटा या गावामधील काही आदिवासी कुटुंबांतील प्रमुखांची नावं आढळून आली. इतकंच काय तर या कुटुंब प्रमुखांच्या नावे लिफाफ्यात भरलेली काही रक्कमही आढळून आली. या सगळ्या लिफाफ्यासह आणि संशयितांविरोधात तरुणांनी संताप व्यक्त केला आणि त्यांना पोलिसांच्या हवाले केलं. एकूण चार जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलं असून पुढील तपास केला जातोय.

व्हिडीओतून संताप

हिंदू बांधवांचं धर्मांतर केलं जात असल्याचा आरोप करत एक व्हिडीओही तरुणांनी रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये तरुणांनी धर्मांतर करण्यासाठी उकसवणाऱ्यांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तसंच कशा प्रकारे लिफाफ्यातून पैसे देत, धर्मांतर करण्याचा घाट घातला जातो आहे, याचा पर्दाफाशही केला आहे. कायद्याविरोधात धर्मांतर करण्यासाठीचं बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या या लोकांना आम्ही सोडणार नाही, असं म्हणत तरुणांनी व्हिडीओमध्ये संताप व्यक्त केला आहे. तसंच लिफाफे आणि त्यात पैसे असल्याचंही या तरुणांनी काढलेल्या व्हिडीओतून समोर आले आहेत.

हे सुद्धा वाचा

डहाणू पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत गुन्हा नोंदवून घेतलाय. आता पोलिसांकडून याप्रकरणी नेमकी पुढे काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.