राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर दगडफेक, RSS कडून शक्तीप्रदर्शन करत…

Thane News: संघाच्या प्रशिक्षण शिबिरावर यापूर्वी दोन वेळा अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यावेळी चुकून दगड आले असावेत, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु आता रविवारी पुन्हा दगडफेकीचा प्रकार घडाला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरावर दगडफेक, RSS कडून शक्तीप्रदर्शन करत...
rss file photo
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 11, 2025 | 1:14 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या प्रकरणानंतर संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. या कार्यकर्त्यांनी शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामधील चार जण अल्पवयीन असल्याची पोलिसांनी दिली.

कुठे घडली घटना

डोंबिवलीतील ठाकुर्लीजवळ असलेल्या कचोरे गाव येथील वीर सावरकर नगर येथील एका मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशिक्षण शिबीर सुरु आहे. या शिबिरात ३५ मुले सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण शिबिरावर रविवारी रात्री काही जणांनी दगडफेक केली होती. त्यानंतर याप्रकरणी कचोरे संघ शाखेकडून टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

संघाच्या शाखेवर दगडफेक झाल्यानंतर मंगळवारी सायंकाळी मोठ्या प्रमाणात आरएसएसचे कार्यकर्ते एकत्र आले. खंबाळपाडा येथे आरएसएसच्या कार्यकर्त्यांचे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, वंदे मातरम, भारत माता की जय अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर सूर्यनमस्कार, दंड प्रशिक्षण, खो खो, कबड्डीसह इतर खेळ खेळण्यास सुरवात झाली.

पोलिसांकडून पाच जण ताब्यात

पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यामधील चार जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा तपास पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरु केला आहे. दगडफेकीच्या घटनेनंतर या भागात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

दोन वेळा दगडफेक

दरम्यान, संघाच्या प्रशिक्षण शिबिरावर यापूर्वी दोन वेळा अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यावेळी चुकून दगड आले असावेत, असे समजून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परंतु आता रविवारी पुन्हा दगडफेकीचा प्रकार घडाला. मुले मैदानात विविध प्रकारच्या खेळाचे प्रशिक्षण घेत होती. त्यावेळी ही दगडफेक झाली. त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला. यामुळे कचोरे येथील संघ शाखेचे चालक संजू चौधरी, पवन कुमार यांनी गुन्हा दाखल केला.