Tv Actress Dupped : अभिनेत्रालाही डिजीटल अरेस्टचा दणका, घातला लाखोंचा गंडा

मुंबईत एका अभिनेत्रीला 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली सायबर भामट्यांनी लाखो रुपयांना फसवले आहे. दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचे भासवून, तिला ७ तास धमकावून तिच्याकडून लाखो रुपये उकळले. या घटनेमुळे मुंबईतील सायबर फसवणुकीचा धोका पुन्हा अधोरेखित झाला असून, नागरिकांनी सावध राहणे महत्त्वाचे आहे.

Tv Actress Dupped : अभिनेत्रालाही डिजीटल अरेस्टचा दणका, घातला लाखोंचा गंडा
Updated on: Oct 17, 2025 | 11:13 AM

मुंबईत गुन्ह्यांच्या अनेक घटना समोर येत असतात. आजकाल डिजीटल अरेस्टचे अनेक गुन्हेही घडल्याचे उघड झाले असून जनसामान्यांना मोठा फटका बसल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकत , वाचत असतो. पण मुंबईत पुन्हा असाच एक प्रकार घडला असून यावेळी एका अभिनेत्रीही डिजीटल अरेस्टची शिकार ठरली असून तिला लाखोंचा फटका बसला आहे. काही सायबर भामट्यांनी या अभिनेत्रीला तब्बल 7 तास डिजिटल अरेस्ट खाली बसवून ठेवलं. एवढंच नव्हे तर त्यांनी तिच्याकडून तब्बल साडेसहा लाख रुपये उकळले असल्याचेही उघड झाले आहे. या संदर्भात संबंधित अभिनेत्रीने फसवणूक झाल्याची तक्रार देताच पोलिसानी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

पोलिस असल्याचं भासवून घातला लाखोंचा गंडा

मिळालेल्या माहितीनुसार, ही अभिनेत्री पाच महिन्यांपूर्वी पश्चिम बंगालहून मुंबईत आली होती. तिला एक फोन आला आणि दिल्ली पोलीस अधिकारी असल्याचं भासवून डिजीटल अरेस्ट करत लाखो रुपये उकळण्यात आले. तिच्याकडून तब्बल 6.5 लाख रुपये घेण्यात आल्याचे समजते. सोमवारी हा प्रकार डल्याची माहिती समोर आली आहे. बँकेची फसवणूक केल्याच्या प्रकरणात अडवू, तुमचा पासपोर्ट फ्रीज करू अशी धमकीदेखील तिला देण्यात आली होती. मात्र अखेर एका अ‍ॅपनं त्या नंबरवरुन आलेला फोन स्पॅम कॉल असल्याचं सांगितल्यावर त्या अभिनेत्रीला आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं. त्यानंतर तिने तात्काळ ओशिवरा पोलीस स्टेशन गाठलं आणि सगळा प्रकार कथन करत एफआयआर दाखल केला. पोलिसांनी घटनेची नोंद करून घेत गुन्हा दाखल केला आहे.

असा लावला चुना

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या अभिनेत्रीला सोमवारी एका माणसाचा फोन आला, एक कंपनीचा कार्यकारी अधिकारी असल्याचे सांगत त्याने ओळख करून दिला. तुमच्या सिमकार्डवरून बँकेच्या फसवणुकीचे काम बेकायदेशीरपणे झाल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे ती हादरली. मात्र आता दिल्ली पोलीस अधिकाऱ्याच्या व्हिडीओ कॉल येईल, वाट पहा असेही तिला सांगण्यात आलं.

त्यानंतर युनिफॉर्म घातलेल्या बनावट पोलिसाने तिला न्यायलयाची खोटी नोटीस दाखवली आणि धमकी दिली. चौकशीच्या नावाखाली साडेसहा लाख रुपये बँक खात्यात बरले नाही तर तुमचा पासपोर्ट गोठवला जाईल अशी धमकी देण्यात आली. तसेच ही चौकशी पूर्ण झाली की तुमचे पैसे परत मिळतील असेही सांगण्यात आलेय या सगळ्या प्रकारामुळे अतिशय भेदरलेल्या अभिनेत्रीने त्यांनी सांगितलं तस करत पैसे भरले. मात्र पैसे ट्रान्सफर झाल्यानंतरही त्या इसमाने तिला परत परतच कॉल केला, त्यामुळे तिला संशय आला. तिने तिच्या फोनवर असलेलं एक अॅप तपासल्यावर तो नंबर बोगस असून तिची फसवणूक झाल्याचं उघड झालं. तिने तातडीने ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.