
मुंबईत रोजच्या रोज गुन्ह्यांच्या कोणत्या ना कोणत्य घटना घडतच असतात, पण त्यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र धाबे दणाणले असून ते भीतीच्या सावटाखाली जगताना दिसतात. मुंबईतील पश्चिम उपनगरांपैकी एक असलेल्या अंधेरीतील दुहेरी हत्याकांडामुळे नागरिक पुन्हा हादरले आहेत. अवघ्या 23 वर्षांच्या तरूणाने त्याचा जन्मदाता पिता, आजोबा आणि काकांवर हल्ला चढवला. त्यामध्ये त्याच्या वडिलांचा आणि आजोबांचा मृत्यू झाला तर काका गंभीर जखमी आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे त्या तिघांवर हल्ला करून दोघांचे प्राण घेणारा तो तरूण या हत्याकांडानंतर स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये हजर झाला आणि त्याने पोलिसांसमोर गुन्ह्याची स्पष्ट कबुली दिली.
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अंधेरीत ही भयानक घटना घडली. चेतन भत्रे असे आरोपीचे नाव असून तो 23 वर्षांचा आहे, तो डिलीव्हरी बॉय म्हणून काम करत होता. वडील, आजोबा आणि काकांवर हल्ला करून, दोघांचे प्राण घेणारा चेतन बुधवारी पहाटेच्या सुमारास पोलिस स्टेशनला आला आणि गुन्ह्याची कबुली दिली. लहानपणापासून होणाऱ्या छळामुळे कंटाळून, संतापाचा कडेलोट झाल्याने आपण हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं.
या हल्ल्यामध्ये चेतनचे वडील मनोज (वय 57 ) यांचा जागीच मृत्यू झाला तर आजोबा (वय 79) यांचाही जीव गेला. तर काका अनिल गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सततचा छळ, दारू पिऊन धिंगाणा, संतापाचा झाला कडेलोट आणि चाकूने काढला काटा
आपण हे कृत्य का केलं याची कबुलीही चेतनने पोलिसांसमोर दिलीच. लहानपणापासूचनच आपले आजोबा, वडील आणि काका हे आपल्याला आणि आईला सतत त्रास द्यायचे, छळायचे. त्याच छळाला कंटाळून चेतनची आई घर सोडून निघून गेली. पण तरीही त तिघे सुधारलेच नाहीत. त्याचे वडील, आजोबा आणि काका नेहमी दारू प्यायचे आणि पैशांसाठी त्रास द्यायचे. आपला आणि बहिणीचा पगारही हिसकावून घ्यायचे असे त्याने सांगितले.
मंगळवारी मात्र हद्द झाली. त्या रात्री 11 च्या सुमारास चेतन कामावरून परत आला, तेव्हा वडिलांशी त्याच्याशी पैशांवरून पुन्हा भांडण सुरू केलं. आजोबा आणि काकांनीही वडिलांना साथ दिली. यामुळे चेतन संतापला, त्याच्या संतापाचा कडेलोट झाला. त्याने स्वयंपाकघरातू चाकू आणऊन वडिलांवर वार केला, ते रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. नंतर चेतनने आजोबा आणि काकांवरही वार केले. त्यामध्ये त्याच्या आजोबांचाही मृत्यू झाला तर काका गंभीर जखमी झाला. या हत्याकांडानंतर चेतन स्वत:च एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि संपूर्ण घटना सांगत गुन्ह्याची कबूली दिली. यामुळे मुंबई प्रचंड हादरली आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे. आजोबा आणि वडिलांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. जखमी काकावर रुग्णलयात उपचार सुरू आहेत.