
अनंत चतुर्दशी नुकतीच पार पडली आणि सर्वांनी लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप दिला. मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाचा विसर्जन सोहळाही यंदा प्रचंड गाजला. शनिवारी वाजत गाजत निघालेली मिरवणूक, त्यात उत्साहाने सहभागी झालेले नागरिक, कार्यकर्ते यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली, ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला. नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाला साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्याची सुरूवात यंदा उत्साहात झाली असली, तरी समुद्रातील भरती-ओहोटीमुळे लालबागच्या राजाला तब्बल 8 तास पाण्यातच थांबून राहावे लागले होते. यंदा लालबागच्या राजासाठी खास अत्याधुनिक तराफा बनवण्यात आला होता. मात्र याच तराफ्यामुळे विसर्जनासाठी विलंब झाला.त्यामुळे बरीच टीकाही झाली.
दरम्यान याच लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान काही अनुचित प्रकार घडल्याचे समोर आले असून विसर्जन मिरवणुकीता अनेकांना चोरांचा फटका बसला. मिळालेल्या माहितीनुसार, लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान 100 पेक्षा अधिक मोबाईल फोन आणि अनेक सोन्याच्या साखळ्या चोरीला गेल्या. दरम्यान मोबाईल चोरी प्रकरणात 4 तर सोनसाखळी चोरी संदर्भात 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय झालं ?
मुंबईतील सर्वात प्रमुख आणि लोकप्रिय गणेशमूर्ती मानल्या जाणाऱ्या लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत यंदा पुन्हा लाखो भाविकांची मोठी गर्दी दिसून आली. लालबाग ते गिरगाव चौपाटी या प्रवासाला सुमारे 32 ते 35 तास लागतात. आपल्या लाडक्या देवाचे दर्शन घेण्यासाठी गर्दीच गर्दी झाली. यंदाल तर हा विसर्जन सोहळा अनेक तास चालला. तराफ्यामुळे, भरतीमुळे विसर्जन बराच काळ रखडलं होतं. मात्र याच भक्तीला, उत्साहाला चोरांमुळे गालबोटच लागलं. कारण गुन्हेगारांनी गर्दीचा फायदा घेतला आणि अनेक भाविक चोरीला बळी पडले.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षीच्या मिरवणुकीत मोबाईल फोन चोरीच्या 100 हून अधिक घटना घडल्या. याप्रकरणी काळाचौकी पोलिस ठाण्यात अनेकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत तर पोलिसांनी आतापर्यंत अधिकृतपणे 10 गुन्हे दाखल केले आहेत. त्यापैकी 4 गुन्हे सोडवण्यात आले आहेत, तर 4 चोरीचे फोन जप्त केले आहेत.
फक्त मोबाईल चोरीच नव्हे तर सोन्याच्या साखळी चोरीच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. आत्तापर्यंत दोन सोन्याच्या साखळ्या जप्त करण्यात आल्या आहेत आणि तब्बल 12 आरोपींना सोनसाखळी चोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आतापर्यंत मोबाईल चोरीच्या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर 12 आरोपींना चेन-स्नॅचिंगच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास शुरु आहे आणि गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.