घटस्फोट देत नाही म्हणून पत्नी भडकली, मुलाच्या मदतीने रचला भयानक कट

नवी मुंबईतील उलवे येथे पत्नीने आपल्या मुलाच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. घटस्फोटाच्या नकारानंतर पत्नी रेश्मा मोरे हिने मित्रांच्या मदतीने पतीचा खून केला.

घटस्फोट देत नाही म्हणून पत्नी भडकली, मुलाच्या मदतीने रचला भयानक कट
मुलगा व मित्राच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 01, 2025 | 1:29 PM

पती-पत्नीचं नातं हे प्रेमाचं, विश्वासाचं असतं, पण त्याच नात्यात आदर, प्रेम नसेल तर संसार उद्ध्वस्त होऊ शकतो. सततची भांडणं, वाद याला कंटाळून पत्नीने पतीकडे घटस्फोटाची मागणी केली. पण त्याने घटस्फोट देण्यासाठी नकार दिल्यानंतर त्याच पत्नीने आपल्या मुलाला साथीला घेऊन, मित्राच्या मदतीने भयानक कट रचला. मुलाच्या मदतीने महिलेने तिच्याच पतीच्या ज्यूसममध्ये नशेच्या गोल्या टाकल्या आणि त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील उलवे परिसरात हा भयानक प्रकार घडला. मुलगा व मित्राच्या मदतीने पतीचा खुन करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात आलं. सचिन मोरे असे मृत इसमाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुार, आठवडाभरापूर्वी वहाळ खाडी परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. सचिन मोरे असं त्याचं नाव असल्याची माहिती समोर आली. तपासादरम्यान मृताची पत्नी रेश्मा मोरे हिने पती मिसिंग असल्याची तक्रार पोलिसांत दिल्याचे उघड झाले. तेव्हा उलवे पोलिसांनी संबंधित अनोळखी मृतदेहाचा फोटो दाखवला असता, रेशमानं हा मृतदेह तिच्या पतीचा असल्याचं सांगितलं. पोलिसांनी तिची चौकशी केली असता तिने उडवाउडवीची उत्तरं दिली होती. तिची वागणूकही विचित्र वाटल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी रेश्मा राहत असलेल्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआर रेकॉर्ड देखील काढले. तसंच शविच्छेदनात तिच्या पतीचा खून झाल्याचा स्पष्ट झालं.

असा काढला काटा

अखेर पोलिसांनी तिची दरडावून चौकशी केली असता तिने पतीचा खून केल्याची कबुली दिली. पत्नी रेश्मा मोरे हिने पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या. यानंतर आरोपी रोहित टेमघर आणि प्रथमेश म्हात्रे यांच्या मदतीने ओढणीने गळा आवळून हत्या केली. पतीशी रोड वाद व्हायचे, भांडणं व्हायची त्याला कंटाळून तिने घटस्फोट मागितला होता , पण त्याने घटस्फोट देण्यासनही नकार दिला. अखेर या सर्व प्रकाराला वैतागून रेश्माने तिच्या मुलाला विश्वासात घेतलं आणि दोन मित्रांच्या मदतीने पतीचा ज्यूसमध्ये गोळ्या मिसळल्या.

त्याला बरं वाटेनासं झाल्यावर, रुग्णालयात नेण्याचे नाटकं करून उलवे, नेरुळ, कलम्बोली, कामोठे, JNPT, उरण परिसरात फिरवले आणि शेवटी जासई येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ रिक्षा थांबवून रेश्मा मोरेने ओढणीने नवऱ्याचा गळा आवळून खून केला. नंतर वहाळ खाडी जवळ सचिन मोरे याचा मृतदेह फेकून देण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी रेश्मा मोरे, मित्र रोहित टेमकर, रिक्षा चालक प्रथमेश म्हात्रे यांना अटक करण्यात आली असून अल्पवयीन मुलाला बालसुधार गृहात ठेवण्यात आले आहे.