पोलीस अचानक स्मशानभूमीत पोहोचली, कबर खोदली अन्…सहा दिवसांपूर्वी काय घडलं?

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये हुंडाबळीचा एक धक्कादायक प्रकार घडला आहे. नूरजहां खातून या महिलेचा तिच्या सासऱ्यांनी बाईकची मागणी पूर्ण न झाल्याने खून केला आणि तिचा मृतदेह स्मशानभूमीत गाडला. सहा दिवसांनंतर पोलिसांना मृतदेह सापडला. तिच्या तीन मुलांचाही संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पोलीस अचानक स्मशानभूमीत पोहोचली, कबर खोदली अन्...सहा दिवसांपूर्वी काय घडलं?
| Edited By: | Updated on: Jan 26, 2025 | 8:10 PM

बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये हुंडाबळीचं प्रकरण घडलं आहे. सून हुंडा आणत नाही म्हणून सासरच्या लोकांनी आधी तिचा प्रचंड छळ केला. तिला मानसिक त्रास दिला. त्यानंतर तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. घरापासून 500 मीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीत जाऊन त्यांनी मृतदेह गाडला. मृतदेह गाडण्यासाठी दोन फूट खोल खड्डा खोदला होता. त्यानंतर काम फत्ते झालं म्हणून त्यांनी सुटकेचा श्वासही घेतला होता. पण सहा दिवसानंतर पोलीस थेट स्मशानभूमीत आले. खड्डा खोदला अन्… सहा दिवसापूर्वी काय घडलं? याची उलगडा आता पोलिसांनी केला आहे.

या महिलेने तिच्या माहेरून बाईक आणली नाही, त्यामुळे तिचा खून केल्याचं सांगितलं जात आहे. तिच्या तीन मुलांचा मृत्यूही संशयास्पदरित्या झाला आहे. बरूराज पोलीस ठाण्याच्या परिसरातील बाडा बैजनाथ येथे नाजीर राहतो. त्याची पत्नी नूरजहां खातून हिचाच खून करण्यात आला आहे. पोलिसांनी तिचा मृतदेह कबर खोदून बाहेर काढला आहे. मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत तिचा मृतदेह बाहेर काढला. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी एसकेएमसीएच रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. स्मशानभूमीतील कबर खोदून मृतदेह काढण्याची व्हिडीओग्राफी करण्यात आली आहे. सहा दिवसानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. तिच्या कुटुंबीयांनी कपडे पाहून मृतदेहाची ओळख पटवली आहे.

हत्या केली, मृतदेहाचं दफन

ही घटना जिल्ह्यातील बडा बैजनाथ गावातील आहे. या प्रकरणी मृतक नूरजहांची आई चानो खातून यांनी बरुराज पोलीस ठाण्यात 21 जानेवारी रोजी जावई नाजिर हुसैनसहीत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या पाचही जणांवर मुलीची हत्या करून तिचा मृतदेह गायब केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास करत असतानाच चानो यांना आपल्या मुलीचा मृतदेह दफन केल्याची माहिती मिळाली. तिने पोलिसांना ही बाब सांगितल्यानंतर हत्याकांड उघड झालं आहे. माझा जावई बाईक मागत होता. बाईकचे पैसे दिले नाहीत म्हणून त्याने मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जवळच्या कब्रस्तानात दफन केला. ही घटना 19 जानेवारी रोजी घडल्याचा दावा चानो यांनी केला आहे.

2017 झालं होतं लग्न

चानो खातून यांच्यानुसार त्यांची मुलगी नूरजहां खातून हिचा नाजिर सोबत 2017मध्ये निकाह झाला होता. तेव्हापासूनच नूरजहांचे सासू सासरे बाइकची मागणी करत होते. पण नूरजहांच्या आईवडिलांनी बाइक देण्यास असमर्थता दर्शवली. तसेच त्यांच्यावर उरलेली रक्कम देण्याचाही दबाव टाकला जात होता. मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या मंडळीने नूरजहांला बेदम मारहाण केली. 19 जानेवारी रोजी नूरजहांला एवढा मार दिला की त्यातच तिचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी नूरजहाँचा मृतदेह दफन केला.

तीन मुलांचा संशयास्पद मृत्यू

नूरजहांला दोन अल्पवयीन मुली आहेत. तिच्या तीन मुलांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. आम्हाला या घटनेची माहिती मिळाली होती. चानो खातून यांच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत कब्रस्तानातील कबर खोदण्यात आली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे. मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे, असं ग्रामीण एसपी विद्यासागर यांना सांगितलं.