
नागपुरातील एका महिलेने पतीचे व्हॉट्सॲप चेक करून वाईट कृत्य उघड केले आहे. पती आपली खरी ओळख लपवून अनेक महिलांना डेट करत होता आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवत असल्याचे सर्वांसमोर आणले आहे. एवढेच नाही तर त्याने अनेक महिलांचे अश्लील व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केल्याचे देखील पोलिसांना सांगितले आहे.
पत्नीने पोलिसांना दिले पुरावे
संशय आल्याने एके दिवशी महिलेने पतीचे व्हॉट्सॲप चेक केले. त्याचे चॅट्स वाचून पत्नीला धक्काच बसला. चॅटमध्ये त्याचे अनेक महिलांशी संभाषण झाले होते. या संभाषणामध्ये त्याने तो बॅचलर असल्याचे सांगून अनेक मुलींना डेट करत असल्याचे समोर आले. याशिवाय त्याने एका अल्पवयीन मुलीलाही आपली शिकार बनवले होते. महिलेने क्षणाचाही विलंब न करता सर्व माहिती पोलिसांना दिली.
चार वर्षांपूर्वी झाले होते लग्न
आरोपी अब्दुल शारिक कुरेशी उर्फ साहिल (३३) याचे नागपूर येथील टेका नाका परिसरात पानाचे दुकान आहे. त्याच्या पत्नीने सांगितले की त्यांचे २०२१ मध्ये लग्न झाले होते आणि त्यांना तीन वर्षांची मुलगी देखील आहे. लग्नानंतर तिला हळूहळू तिच्या पतीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. तो तासंतास फोनमध्ये व्यस्त असतो आणि घरी लक्ष देत नाही याची जाणीव तिला झाली. पत्नीने तपास केला असता संपूर्ण सत्य बाहेर आले. ते पाहून तिच्या पाया खालची जमीनच सरकली.
अल्पवयीन मुलीचीही फसवणूक केली
आरोपीने एका अल्पवयीन मुलीचीही फसवणूक केल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने तिच्या आईने तिला दिलेली सोन्याची अंगठी देखील घेतली होती. ती अंगठी त्याने 30 हजार रुपयांना विकली. हा प्रकार उघडकीस येताच मुलगी आणि तिच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु
पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर अनेक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, इतर पीडित महिलांनाही तक्रारी देण्यास सांगितले आहे. मात्र समाजाच्या भीतीने त्या पुढे येत नाहीत. पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून इतर पीडितांचा शोध घेत आहेत.