शेतकरी महिलेला अश्रू अनावर, कष्टाने पैसे उभे केले, बियाणे घेण्यासाठी बँकेतून पैसे काढले, आणि….

| Updated on: Jun 12, 2021 | 3:51 PM

बियाणे खरेदी करण्यासाठी आपल्या पतीसह कृषी केंद्रात आलेल्या महिलेची तब्बल 49 हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली (Farmer woman money stolen in Yavatmal)

शेतकरी महिलेला अश्रू अनावर, कष्टाने पैसे उभे केले, बियाणे घेण्यासाठी बँकेतून पैसे काढले, आणि....
शेतकरी दाम्पत्य दिवस-रात्री शेतीसाठी राबराब राबले, बियाणे घेण्यासाठी बाजारपेठात आले, आणि.....
Follow us on

यवतमाळ : मुंबई, ठाण्यासह संपूर्ण राज्यात सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे राज्यातील ग्रामीण भागात आता शेतकरी त्यांच्या शेतीच्या कामाला लागले आहेत. शेताची मशागत कसरुन आता पेरणी करण्यात येईल. यासाठी तालुक्यातील बाजारपेठांमध्ये बि-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी जात आहेत. पण काही ठिकाणी शेतकऱ्यांचा भोळ्यापणाचा फायदा घेऊन काही इसम शेतकऱ्यांना लुबाडत असल्याचं समोर आलं आहे. शेतकरी बाजारपेठात खरेदीसाठी गेल्यानंतर काही नराधम गर्दीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांचे पाकीट चोरणे, पैसे चोरणे असे प्रकार करत असल्याचं समोर आलं आहे. यवतमाळमध्ये अशीच काहीशी घटना घडली आहे (Farmer woman money stolen in Yavatmal).

नेमकं काय घडलं?

बियाणे खरेदी करण्यासाठी आपल्या पतीसह कृषी केंद्रात आलेल्या महिलेची तब्बल 49 हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना आज (12 जून) सकाळच्या सुमारास दत्त चौक येथे घडली. शकुंतला गिरडकर असे शेतकरी महिलेचे नाव आहे. संबंधित महिला ही आपले पती महादेव गिरडकर यांच्यासोबत बियाणे खरेदी करण्यासाठी बाजारात आली होती. तत्पूर्वी तिने येथील दत्त चौकातील सेंटर बँकेतून 49 हजाराची रोकड बियाणे खरेदीसाठी काढली. त्यानंतर दत्त चौकातील आणि पुष्पक कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदी करण्यासाठी गेली (Farmer woman money stolen in Yavatmal).

गर्दीचा फायदा घेऊन पैसे चोरीला

महिलेने संबधित दुकानातून चार पाकीट बियाणे खरेदी केले. दरम्यान दुकानात होत असलेल्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील कागदपत्रे आणि रूपये असलेल्या लहान पिशवीतून हातचलाखीने 49 हजाराची रोकड काढली. नंतर कागदपत्रे आणि पिशवी दुकानासमोरच टाकून तिथून पसार झाला. महिलेला जेव्हा याबाबत कळालं तेव्हा तिने दुकानात शोधाशोध केली. आपले पैसे चोरीला गेले हे तिच्या लक्षात आलं तेव्हा तिने हंबरडा फोडला.

पोलिसांकडून तपास सुरु

संबंधित घटनेची माहिती मिळताच अवधूत वाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेनंतर फिर्यादी शकुंतला गिरडकर यांच्या तक्रारीवरून अवधूत वाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : चोराच्या घरातूनच करोडो रुपयांची चोरी, 14 किलो सोनं आणि 56 लाखांच्या कॅशसह 6 अट्टल चोरांना बेड्या!