मॅगी बनवताना भाऊ ओरडला, मैत्रिणींसमोर अपमान झाल्याचा राग, भंडाऱ्यात 13 वर्षीय मुलीची आत्महत्या

| Updated on: May 15, 2022 | 9:34 AM

मैत्रिणींसमोर मोठा भाऊ रागावला म्हणून 13 वर्षीय मुलीने घरातच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना भंडारा शहरानजीकच्या गणेशपूर येथे घडली आहे.

मॅगी बनवताना भाऊ ओरडला, मैत्रिणींसमोर अपमान झाल्याचा राग, भंडाऱ्यात 13 वर्षीय मुलीची आत्महत्या
भंडारा पोलीस
Image Credit source: टीव्ही 9
Follow us on

भंडारा : आपल्या मैत्रिणींच्या समोर मोठा भाऊ रागावला, म्हणून 13 वर्षीय मुलीने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राहत्या घरी गळफास घेऊन अल्पवयीन मुलीने आपलं आयुष्य संपवलं. भंडारा जिल्ह्यातील (Bhandara Crime News) गणेशपूर भागात हा प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे. मैत्रिणींसोबत मॅगी नूडल्स बनवणाऱ्या बहिणीला घरात कशाला केरकचरा करता, असे म्हणत भाऊ रागावला होता. याचा राग मनात धरुन तिने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप आहे. कुटुंबीय घराबाहेर, तर भाऊ आंघोळीला गेल्याची वेळ साधत अल्पवयीन मुलीने खोलीचे दार बंद करुन ओढणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

काय आहे प्रकरण?

मैत्रिणींसमोर मोठा भाऊ रागावला म्हणून 13 वर्षीय मुलीने घरातच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना भंडारा शहरानजीकच्या गणेशपूर येथे घडली आहे.

नेमकं काय घडलं?

सकाळी घरची मंडळी बाहेर कामासाठी गेली असता संबंधित मुलगी आपल्या मैत्रिणीसोबत घरात मॅगी करत होती. त्यावेळी तिचा मोठा भाऊ तिथे आला. घरात कशाला केरकचरा करता, असे म्हणत तिच्यावर रागावला. त्यामुळे तिच्या मैत्रिणी निघून गेला, तर भाऊ आंघोळीसाठी घराच्या मागच्या बाजूला गेला.

हे सुद्धा वाचा

मैत्रिणींसमोर भाऊ रागावल्याचा राग मनात धरुन बालिकेने घराची दोन्ही दारं लावली आणि आढ्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. आंघोळ करुन भाऊ परत आला, तेव्हा दोन्ही दारं बंद होती. खिडकीतून बघितले तर बहीण गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली.

उपचारादरम्यान मृत्यू

आरडाओरडा करताच शेजारी गोळा झाले. दार तोडून घरात प्रवेश करत शेजाऱ्यांच्या मदतीने तिला खाली उतरवले तेव्हा ती जिवंत होती. तिला तात्काळ भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु झाले होते, मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

या घटनेची नोंद भंडारा पोलीस ठाण्यात घेण्यात आली असून बालिकेने क्षुल्लक कारणावरुन टोकाचे पाऊल उचलल्यामुळे गणेशपुरात हळहळ व्यक्त केली जात आहे