नग्न फोटो व्हायरल करेन, नागपुरातील तरुण हनीट्रॅपमध्ये अडकला, वडिलांच्या युक्तीने अशी झाली सुटका

| Updated on: Sep 01, 2021 | 2:29 PM

पीडित तरुणाला अज्ञात मोबाईल नंबरवरुन फोन आला. आमच्याकडे तुझे नग्नावस्थेतील फोटो आहेत. ते व्हायरल करायचे नसतील, तर पैसे दे अशी धमकी देऊन आधी दीड हजार, नंतर पाच हजार आणि अखेरीस सहा हजार रुपये त्याच्याकडून उकळण्यात आले.

नग्न फोटो व्हायरल करेन, नागपुरातील तरुण हनीट्रॅपमध्ये अडकला, वडिलांच्या युक्तीने अशी झाली सुटका
Follow us on

नागपूर : सोशल मीडियावर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून विविध वयोगटातील पुरुषांशी मैत्री करायची, काही दिवस चॅट करुन त्यांना व्हॉट्सॲपवर न्यूड फोटो पाठवायला सांगायचे, त्यानंतर हे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागायची. हनी ट्रॅपचा (Honey Trap) हा फंडा वापरुन देशभरात अनेक टोळ्या धुमाकूळ घालत आहेत. नागपूरच्या सक्करदरा भागातील अशाच एका टोळीचा पर्दाफाश करुन पोलिसांनी टोळीतील एकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे तरुणाच्या वडिलांच्या युक्तीमुळे त्याची सुटका झाली.

मोडस ऑपरेंडी काय होती

रौनक प्रभू वैद्य असं आरोपीचं नाव असून तो नागपुरातील हुडकेश्वरमधील पिपळा फाटा भागात राहतो. टोळीतील तन्वयी नावाच्या तरुणीने काही महिन्यांपूर्वी एका तरुणाला इन्स्टाग्रामवर फॉलो रिक्वेस्ट पाठवली. ती स्वीकारल्यानंतर दोघांचे चॅटिंग सुरु झाले. हळूहळू दोघांच्या गप्पा वाढू लागल्या आणि नंबर एक्स्चेंज झाले. अखेर व्हॉट्सॲपवर बोलणं सुरु झालं. गप्पा हळूहळू अश्लील विषयांकडे वळला. त्यानंतर तन्वयीने त्याच्याकडे नग्न फोटोची मागणी केली. तिच्या बोलण्याला भुलून त्याने आपले न्यूड फोटो तिला पाठवले आणि सुरु झाला खेळ.

फोनवरुन धमकी

एक मे रोजी पीडित तरुणाला अज्ञात मोबाईल नंबरवरुन फोन आला. आमच्याकडे तुझे नग्नावस्थेतील फोटो आहेत. ते व्हायरल करायचे नसतील, तर पैसे दे अशी धमकी देऊन आधी दीड हजार, नंतर पाच हजार आणि अखेरीस सहा हजार रुपये त्याच्याकडून उकळण्यात आले.

वडिलांची तक्रार आणि आरोपी अडकला

बदनामीच्या भीतीने तरुण घाबरला होता. मात्र आरोपीच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याने हा प्रकार आपल्या वडिलांच्या कानावर घातला आणि आरोपींना पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे आरोपी थेट तरुणाच्या घरी पोहोचला. वडील आणि काकांना त्याचे न्यूड फोटो दाखवून ‘तुमचा मुलगा माझ्या नात्यातील तरुणीसोबत अश्लील चॅटिंग करतो’ असे सांगितले. प्रकरण मिटवायचं असेल, तर 50 हजार रुपये द्या, अन्यथा तुमची बदनामी करु, अशी धमकी दिली. वडिलांनी होकार देत त्याला मंगल कार्यालयात बोलावलं. त्याच वेळी त्यांनी सक्करदरा पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. आरोपी पैसे घेण्यासाठी पोहोचताच दबा धरुन बसलेल्या पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

मुंबईत हनी ट्रॅप प्रकरणातून तरुणीची हत्या

दुसरीकडे, फेसबुकवरुन ओळख झाल्यानंतर हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या तरुणीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी मुंबईत उघडकीस आला होता.प्रेमसंबंधात गुंतवून हनी ट्रॅपमध्ये अडकवत तरुणीने आरोपीकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. आरोपी बिपीन विनोद कंडूलना हा वांद्रे परिसरात एका हॉटेलमध्ये कामाला होता. इशिता कंजूर असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून आरोपी बिपीनला हत्येनंतर अवघ्या 12 तासात गुन्हे शाखेने अटक केली होती.

संबंधित बातम्या :

लॉजवर भेट, बलात्काराच्या खोट्या केसची धमकी देत 20 लाखांची मागणी, मुंबईत हनी ट्रॅप

भावाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी बहिणीचा कट, हनी ट्रॅपने आरोपीला छोटा काश्मिरात बोलावलं, पण…

आधी सेक्स चॅट, मग न्यूड व्हिडीओ कॉल, ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकण्यापासून सावध रहा