बंदुकीच्या धाकावर दागिन्यांसह 4 लाख लुटले, पोलिसांनी 12 तासाच्या आत आवळल्या मुसक्या

| Updated on: Jul 06, 2021 | 8:37 PM

भर दुपारी बंदुकीच्या धाकावर सोने-चांदीचे दागिने तसेच 4 लाखांची रोकड लुटणाऱ्या चार भामट्यांपैकी दोघांच्या नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

बंदुकीच्या धाकावर दागिन्यांसह 4 लाख लुटले, पोलिसांनी 12 तासाच्या आत आवळल्या मुसक्या
ARREST
Follow us on

नागपूर : भर दुपारी बंदुकीच्या धाकावर सोने-चांदीचे दागिने तसेच 4 लाखांची रोकड लुटणाऱ्या चार भामट्यांपैकी दोघांच्या नागपूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अवघ्या 12 तासांच्या आत पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. नागपूर शहरातील एका सराफा दुकानावर चार जणांनी सोमवारी (5 जुलै) दरोडा टाकला होता. या गुन्ह्याचा छडा लावताना पोलिसांनी ही कारवाई केली. (Nagpur Police nabbed Two robbers from Madhya Pradesh who looted jewellery and 4 lakh rupees)

बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकला

मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवनी ज्वेलर्स या सराफा दुकानावर सोमवारी भर दुपारी दरोडा पडला. दोन दुचाकीवरून आलेल्या एकूण चार आरोपींनी बंदुकीच्या धाकावर सोने-चांदीच्या दागिन्यांसह 4 लाख रुपये पळवले. या दरोड्यात चोरट्यांनी तब्बल 20 लाखांचा मुद्देमाल लुटून नेला. हा प्रकार घडल्यानंतर नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली. भर दुपारी लोकांची गर्दी असताना बंदुकीच्या धाकावर झालेल्या या लुटीमुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर दरोड्यात सामील असलेल्या आरोपींना पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते.

आरोपी मध्य प्रदेशातील कटनी येथील एका लॉजवर थांबले

ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यावेळी सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिसांनी या आरोपींचा छडा लावला. दरोडा टाकल्यावर हे आरोपी मध्य प्रदेशातील कटनी येथील एका लॉजवर थांबले असल्याचे पोलिसांना समजले. नागपूर पोलिसांना मध्य प्रदेशमध्ये जाण्यासाठी एकूण पाच ते सहा तास लागले असते. याच कारणामुळे आरोपींना जेरबंद करण्यासाठी नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांची मदत घेऊन सापळा रचला.

पोलिसांच्या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत

या कारवाईत चारपैकी दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. तर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. भर दुपारी टाकण्यात आलेल्या दरोड्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांच्या सातर्कतेमुळे दोन आरोपींना पकडण्यात यश आलंय. आरोपींना बेड्या ठोकल्यामुळे व्यापारी वर्गात समाधान व्यक्त केलं जातंय. तसेच नागपूर पोलिसांनी केलेल्या या धाडसी कारवाईचे अनेक स्तरातून स्वागत होत आहे.

इतर बातम्या :

रेमरडेसिव्हीर इंजेक्शनच्या नावाखाली फसवणूक, 60 लाख रुपये जप्त, 6 जणांना बेड्या, मुंबई पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

कानठळ्या बसवणाऱ्या मॉडिफाइड सायलेन्सरचा चुराडा, अंबरनाथमध्ये 150 सायलेन्सरवर रोडरोलर

इराण ते उरण, समुद्राने 2,000 कोटींच्या हेरॉईनची तस्करी, टॅल्कम पावडरमध्ये लपवला ड्रग्जसाठा

(Nagpur Police nabbed Two robbers from Madhya Pradesh who looted jewellery and 4 lakh rupees)