टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात, SRPF जवानाचा मृत्यू, नागपूर हळहळलं

| Updated on: Sep 02, 2021 | 11:58 PM

नागपूरच्या हिंगणा टी पॉईंटजवळ गुरुवारी (2 सप्टेंबर) टिप्पर आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका एसआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला आहे.

टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात, SRPF जवानाचा मृत्यू, नागपूर हळहळलं
टिप्पर आणि दुचाकीचा भीषण अपघात, SRPF जवानाचा मृत्यू, नागपूर हळहळलं
Follow us on

नागपूर : नागपूरच्या हिंगणा टी पॉईंटजवळ गुरुवारी (2 सप्टेंबर) टिप्पर आणि दुचाकी यांचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका एसआरपीएफ जवानाचा मृत्यू झाला आहे. अपघाताच्या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतक जवानाचं सुरेश सोनकुसरे असं नाव आहे. ते एसआरपीएफ ग्रुपच्या 13 डीचे जवान होते. सोनकुसरे यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मृतक जवान वैयक्तिक कामांसाठी घराबाहेर पडले

सुरेश सोनकुसरे हे एमआयडीसी परिसराती वैशाली नगर परिसरात वास्तव्यास होते. ते गुरुवारी सुट्टी असल्याने त्यांच्या स्वत:च्या काही वैयक्तिक कामांसाठी घराबाहेर पडले होते. ते दुपारच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यांना काही कामानिमित्त दवाखान्यातही जायचं होतं. पण रस्त्यावर मोठा अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

अपघातात जागीच मृत्यू

संबंधित अपघाताची घटना ही दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. रस्त्याने भरधाव टिप्पर समोरुन जात होतं. ते पाहुन सुरेश सोनकुसरे कदाचित गोंधळले असल्याची शक्यता आहे. त्यातच ते त्या टिप्परच्या मागच्या चाकात आले. यावेळी मागच्या चाकात ते चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संबंधित घटना भर दुपारी घडल्याने रस्त्यावर मोठी वर्दळ होती.

प्रत्यक्षदर्शींना मोठा धक्का

अपघाताच्या घटनेची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर सोनकुसरे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. या अपघाताने प्रत्यक्षदर्शींचाही काळाजाचा ठोका चुकला. त्यांनादेखील मोठा धक्का बसला.

शहापुरातही भयानक अपघात

या घटनेच्या एक दिवस आधी बुधवारी (1 सप्टेंबर) शहापुरात अपघाताची घटना समोर आली होती. शहापूर-डोलखांब रस्त्यावर पांढरीचा पाडा येथे बोलेरो गाडीने एका टूव्हिलरला जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झाला. या अपघातात एक कातकरी समाजाचे कुटुंब पूर्णपणे उध्वस्त झाले. निभळपाडा येथील कैलास मुकणे हे आपली 8 वर्षीय मुलगी जान्हवी आणि पत्नी कमल मुकणे सोबत दुचाकीवर होते. ते सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास टेंभुर्ली येथून घरी परतत होते. तेव्हा डोळखांबकडून शेणव्याकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या बोलेरो गाडीने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिल्यानं अपघात झाला.

या अपघातात कैलास मुकणे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची पत्नी कमल मुकणे यांनाही गंभीर दुखापत झाली. त्यामुळे मुंबई येथील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांचाही उपचारा दरम्यानच मृत्यू झाला. त्यांच्या 8 वर्षीय मुलीच्या पायाला गंभीर दुखापत झालीय. तिचा पाय गाडीखाली चिरडला गेल्यानं पायाचं हाड मोडून मांसाबाहेर आलं होतं. त्यामुळे डॉक्टरांना हा पाय कापून काढवा लागला. जान्हवीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :

पुण्यात भरदिवसा घरफोडी, चोरट्याला पकडण्यासाठी मागे धावलेल्या तरुणावर गोळीबार, भयानक थरार

संध्याकाळपर्यंत बदली न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देणारे हवालदार गायब, जालना पोलिसात खळबळ