बड्या हॉटेलच्या शेजारी असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, पोलीसांच्या छाप्यात काय-काय आलं समोर ?

नाशिक शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी राजरोसपणे सुरू असलेल्या कुंटण खान्यावर नाशिक पोलीसांनी छापा टाकल्यानं खळबळ उडाली आहे.

बड्या हॉटेलच्या शेजारी असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा, पोलीसांच्या छाप्यात काय-काय आलं समोर ?
Image Credit source: Google
| Updated on: Jan 21, 2023 | 4:43 PM

नाशिक : देहविक्रीचा व्यवसाय करण्याचे ठिकाण म्हणजेच कुंटणखाना. त्याला महाराष्ट्रात कायदेशीर परवानगी नाही. तरीही अनेक ठिकाणी राजरोसपणे कुंटणखाना छुप्या पद्धतीने किंवा हप्ते देऊन हा व्यवसाय केला जातो. पोलीसांच्या निदर्शनास आल्यास पोलीस कारवाई करतात. त्यामुळे पोलिसांना कुठलीही खबर न लागू देता कुंटणखाना चालविण्याचे अनेकजण धाडस करतात. असेच धाडस नाशिकमधील एका नामांकित हॉटेलच्या बाजूला असलेल्या एका बंगल्यात काही जणांनी केले होते. द्वारका परिसर खरंतर शहरातील अत्यंत वर्दळीचं ठिकाण म्हणून ओळखला जातो. याच परिसरात हा कुंटणखाना एका बंगल्यात सुरू होता. विशेष म्हणजे या कुंटणखान्यांपासून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहेत. परंतु तरीही राजरोसपणे हा कुंटणखाना सुरू होता. मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या पथकाने नुकतीच याठिकाणी मोठी कारवाई केली आहे. तीन पुरुषांसह पाच महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून हजारो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या सुचनेवरुन मुंबई नाका पोलीसांनी ही मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये एकूण आठ जणांना ताब्यात घेतले असून मोबाईल, दुचाकी आणि इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे.

शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हा कुंटणखाना होता. मुंबई-आग्रा महामार्गाच्या लगतची ही कारवाई करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

नाशिक शहरात खरंतर मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय करणाऱ्याची जोरदार चर्चा होती, त्याच काळात पोलीसांनी द्वारका परिसरात ही कारवाई केल्यानं अवैध प्रकारे कुंटणखाना चालवणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

कुंटणखाना चालविण्यासाठी परराज्यातील महिलांचा मोठा सहभाग असल्याचे आत्तापर्यंत समोर आले आहे. नुकत्याच झालेल्या कारवाईत याबाबत स्पष्टता नसली तरी पुरुष मात्र स्थानिक असल्याचेच समोर आले आहे.

नाशिक शहर पोलीसांनी केलेली ही कारवाई शहरात चर्चेचा विषय असली तरी नाशिक शहर पोलीसांनी अशा स्वरूपाचे कुठे अवैध धंदे सुरू असल्यास पोलीसांना माहीती देण्याचे आवाहन केले आहे.