Thief’s letter:‘सॉरी मला माफ करा’ म्हणत चोरट्याचे अफलातून पत्र, पुढे जे काही झाले ते वाचून व्हाल थक्क!

| Updated on: Jan 10, 2022 | 12:55 PM

आता कोणालाही प्रश्न पडेल की, चोरट्याने का केले असेल असे. खरे तर कोणावर कितीही वाईट वेळ येऊ शकते. अनेकदा पैशाशिवाय कामे होतच नाहीत. भावनेच्या भरात व्यक्ती एखादे टोकाचे पाऊल उचलतो. वाईट कृत्य करतो. मात्र...

Thief’s letter:‘सॉरी मला माफ करा’ म्हणत चोरट्याचे अफलातून पत्र, पुढे जे काही झाले ते वाचून व्हाल थक्क!
Thief's letter
Follow us on

नाशिकः नाशिकमध्ये एका चोरट्याने केलेली गांधीगिरी सध्या खूपच चर्चेत आहे. त्याने जेलरोड परिसरातील ज्या घरात चोरी केली, त्या घरमालकाला पत्र लिहिले आणि पुढे जे काही केले, ते वाचून तुम्हीही थक्क व्हाल. कारण घडलेच तसे आहे. आता नाशिकरोड पोलिसांनी या सद्गुणाच्या पुतळ्याचा शोध सुरू केला आहे. तो कधी थांबेल आणि तो कधी गावेल माहित नाही. मात्र, त्याच्या या करामतीने तो अज्ञात पाहुणा चांगला चर्चेत आलाय हे मात्र नक्की. जाणून घ्या, त्याने काय केले ते…

नेमके प्रकरण काय ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकमधल्या जेलरोडजवळील विठ्ठलनगर येथील शरद साळवे यांच्या घरात शनिवारी चोरी झाली. त्यांनी रितसर पोलीस ठाण्यात जावून तक्रार नोंदवली. नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या पथकाने याप्रकरणाचा तपास सुरू केला. पंचनामा करण्यासाठी आधी साळवे यांचे घर गाठले. त्यांनी चोरी कशी झाली, याची सविस्तर माहिती घेतली. किती ऐवज गेला, त्यात दागिने किती आणि पैसे किती अशी नोंद केल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली. चोराने कुठून प्रवेश केला असेल, याचा अंदाज बांधला. त्यानुसार ते छतावर चढले. तेव्हा त्यांना तिथे बॅग आढळली. त्या बॅगेत एक पत्र होते.

पत्रात कारण की…

पोलिसांना सापडलेले ते पत्र त्या चोरट्याचे होते. विशेष म्हणजे त्याने ज्यांच्या घरात चोरी केली, त्या घरमालकाला हे पत्र लिहिले होते. त्यात पत्रातला मजकूर असा आहे. चोरटा म्हणतो, ‘मी तुमच्या गल्लीतलाच एक माणूस आहे. मी तुमची बॅग घेतली आणि पत्र्यावर टाकली. मला पैशांची गरज होती, पण मी ते घेतले नाहीत. सॉरी मला माफ करा.’ या पत्रासोबतच बॅगमध्ये सोन्याचा नेकलेस, मंगळसूत्र आणि चोरीचा ऐवज ठेवण्यात आला होता. मात्र, चोरट्याने चोरलेले दागिने आणि पैस देवून जाण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

का केले असेल असे?

आता कोणालाही प्रश्न पडेल की, चोरट्याने असे का केले असेल. खरे तर कोणावरही वाईट वेळ येऊ शकते. अनेकदा पैशाशिवाय कामे होतच नाहीत. भावनेच्या भरात व्यक्ती एखादे टोकाचे पाऊल उचलतो. वाईट कृत्य करतो. मात्र, हे वागणे अनेकदा आतून स्वतःलाच टोचते. स्वतःसोबत मांडलेला हा उभा वैरडाव, हे छळणं या पत्रातून, कृत्यातून थोडेफार कमी होऊ शकते. आपण वागलो ते पुन्हा भरून निघत नाही. मात्र, थोडीफार मनशुद्धी आणि पश्चाताप त्यामुळे ती व्यक्ती पुन्हा या मार्गावर वळणार नाही, असा आशावादही आपण करू शकतो.

इतर बातम्याः

Nashik Corona|नाशिकमध्ये कोरोनाची आकडेवारी किती; कोणत्या बड्या अधिकाऱ्यांनी घेतले बूस्टर डोस?

Gold Price| आली लगीन सराई, करा स्वस्तातले सोने खरेदीची घाई, जाणून घ्या राज्यातले दर…!

Nashik Train| नाशिककरांच्या चेहऱ्यावर हास्य खुलवणाऱ्या भुसावळ-इगतपुरी मेमूचा आज श्रीगणेशा; 18 रद्द गाड्याही आजपासून पूर्ववत