प्रतिष्ठित डॉक्टरांना काही क्षणात लावला चुना, ओटीपी न येता लाखों रुपये गायब झाल्याने पोलिसही चक्रावले, नेमकं काय घडलं

सायबर पोलिसांसमोर दररोज नवीन आव्हान निर्माण होत असतांना शिक्षित माणसांनाही ऑनलाइन फसवणुकीचा झटका बसू लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रतिष्ठित डॉक्टरांना काही क्षणात लावला चुना, ओटीपी न येता लाखों रुपये गायब झाल्याने पोलिसही चक्रावले, नेमकं काय घडलं
Image Credit source: Google
| Updated on: Mar 14, 2023 | 8:51 AM

नाशिक : जसं जसं तंत्रज्ञान विकसित होत चालली आहे तशी तशी सायबर गुन्हेगारी वाढत चालली आहे. ऑनलाइन भामटे देखीलनवनवीन शक्कल लढवत आहे. त्यातच संपूर्ण देशासाठी सायबर गुन्हेगारीचे ( Cyber Crime ) मोठे आव्हान निर्माण झाले आहे. नुकताच नाशिक मधील कॉलेजरोड येथील एका प्रतिष्ठित डॉक्टरला तब्बल चार लाखांना ऑनलाइन गंडा घातला आहे. विशेष म्हणजे यामध्ये कुठलाही ओटीपी आलेला नव्हता. त्यामुळे हा ऑनलाइन गंडा कुणी घातला आणि कसा घातला ? याचा शोध सायबर पोलिसांना घ्यावा लागणार आहे. विजन हॉस्पिटलचे डॉ. विनोद विजन यांना गंडा घातला गेला आहे. यामध्ये केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने हा गंडा घातला गेल्याचे म्हंटले आहे.

केवायसी अपडेट करण्याचा बहाणा करत 3 लाख 99 हजार 984 रुपयांना ऑनलाइन भामट्याने प्रतिष्ठित डॉक्टर विनोद विजन यांना ऑनलाइन चुना लावला आहे. यामध्ये त्यांची स्नुषा डॉ. सृष्टी विक्रांत विजन‎ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तक्रारीनुसार 1 ते 2 मार्च दरम्यान त्यांना मोबाइलवर केवायसी अपडेट करण्याच्या संदर्भात मेसेज आला होता. त्यावरून डॉ. विजन यांनी क्लिक केले होते. त्यानंतर माहिती वाचत असतांना त्यांना अचानक तीन वेळेला पैसे डेबिट झालीचे मेसेज येऊ लागले. त्यामुळे विजन यांना काही सुचेनासे झाले.

विजन यांनी त्यानंतर आपले बँक बॅलन्स चेक केला त्यात बघितले तर विजन यांच्या खत्यातून जवळपास चार लाख रुपये लंपास झाले होते. या प्रकरणी सायबर पोलिस तपास करीत असून हा ऑनलाइन फसवणुकीचा कोणता नवा पॅटर्न आहे का ? की डॉ. विजन यांनाच त्यांची चूक नडली आहे. याचा तपास पोलिसांना करावा लागणार आहे.

विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात विजन यांनी मला कुठलाही ओटीपी आलेला नव्हता असा दावा केला आहे. त्यामुळे हा फसवणुकीचा नवा पॅटर्न तर नाही ना ? असा संशय ही सायबर पोलिसांना येऊ लागला आहे. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासात कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.