दोन भावांची रेस लागली, पळायला सुरुवात झाली अन् तेवढ्यात… शेवटच्या 10 मिनिटात जे घडलं ते वाचून अंगावर येईल काटा
नागपूरच्या संघर्षनगर परिसरात खेळायला गेलेल्या ३ वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. मामाच्या मुलासोबत खेळताना नेमकी काय दुर्घटना घडली आणि पोलिसांनी या घटनेचा तपास कसा लावला, वाचा सविस्तर

खेळता खेळता काळाने घाला घातल्याची एक सुन्न करणारी घटना नागपूरच्या उत्तर भागातील ऑटोमोटिव्ह चौक परिसरात उघडकीस आली आहे. आपल्या मामाच्या मुलासोबत खेळण्यासाठी घराबाहेर पडलेला ३ वर्षीय चिमुकला मोहमद कौनेन याचा मृतदेह शनिवारी सकाळी नाल्यात सापडला. या घटनेमुळे संपूर्ण संघर्षनगर परिसरात शोककळा पसरली आहे. यावेळी कौनेनच्या पालकांचा आक्रोश पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.
नेमकं काय घडलं?
मोहमद कौनेनचे वडील, मोहम्म इमरान हे हँडलूमचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. कौनेनला एक महिन्याची लहान बहीण आहे. शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे घरच्या वातावरणात खेळत असलेला कौनेन सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्याच्या मामाच्या ६ वर्षीय मुलासोबत बाहेर खेळायला गेला. बराच वेळ झाला तरी कौनेन घरी परतला नाही, तेव्हा कुटुंबियांना चिंता वाटली. संपूर्ण रात्र उलटून गेली तरी कौनेनचा पत्ता लागत नव्हता. घरच्यांनी आजूबाजूच्या परिसरात, नातेवाइकांकडे आणि गल्लीबोळात शोधाशोध केली, मात्र तो कुठेही मिळून आला नाही.
मामाच्या मुलाची शांतता आणि पोलिसांचा संशय
कौनेनसोबत खेळायला गेलेला त्याचा ६ वर्षांचा चुलत भाऊ शुक्रवारी रात्री घरी परतला. मात्र तो प्रचंड घाबरलेला होता. दररोज रात्री ११ वाजेपर्यंत जागत राहणारा हा मुलगा त्या दिवशी घरी येताच तातडीने झोपी गेला. जेव्हा त्याला कौनेनबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने आम्ही दोघे रेस खेळत होतो, पण तो कुठे गेला मला माहित नाही, असे उत्तर दिले.
मात्र, पोलिसांनी खेळताना कौनेन नाल्यात पडला असावा. हे पाहून ६ वर्षांचा मुलगा प्रचंड भयभीत झाला. भीतीपोटी किंवा ओरडा मिळेल या दडपणाखाली त्याने ही माहिती कोणालाच सांगितली नसावी, असा अंदाज लावला.
यानतंर पोलिसांनी शनिवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम तीव्र करण्यात आली. ऑटोमोटिव्ह चौकाच्या मागील बाजूला असलेल्या संघर्षनगर नाल्याजवळ काही नागरिकांना संशयास्पद हालचाल दिसली. जवळ जाऊन पाहिले असता, चिमुकल्या कौनेनचा मृतदेह नाल्यातील पाण्यात तरंगताना आढळला. ही माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. कौनेनच्या आई-वडिलांनी आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहिल्यावर जो आक्रोश केला, त्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला.
खेळताना तोल गेल्यामुळे पडला
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. खेळताना तोल गेल्यामुळे कौनेन नाल्यात पडला असावा आणि पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्याचा मृतदेह तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.
