Lucknow News : न्यायालयाच्या आवारातच रक्तरंजित खेळ, मुख्तार अन्सारीचा सहकारी संजीव जीवाची गोळ्या घालून हत्या

लखनऊ दिवाणी न्यायालयाच्या आवारात भयंकर घटना घडली आहे. या घटनेमुळे न्यायालयात तणावाचे वातावरण होते.

Lucknow News : न्यायालयाच्या आवारातच रक्तरंजित खेळ, मुख्तार अन्सारीचा सहकारी संजीव जीवाची गोळ्या घालून हत्या
मुख्तार अन्सारीचा सहकारी संजीव जीवाची गोळ्या घालून हत्या
Image Credit source: Social
| Updated on: Jun 07, 2023 | 6:14 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशातील कुप्रसिद्ध गुन्हेगार आणि अनेक गुन्हेगारी खटल्यातील आरोपी संजीव माहेश्वरी उर्फ जीवा याची बुधवारी लखनऊ दिवाणी न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या गोळीबारात अन्य चार जण जखमी झाले आहेत. जखमी चौघांमध्ये एका मुलीचा आणि एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश आहे. प्राथमिक वृत्तानुसार, हल्लेखोर वकिलांच्या वेशात आले आणि त्यांनी न्यायालयाच्या आवारात गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर लखनौ न्यायालयाच्या आवारात तणावाचे वातावरण होते.

घटनास्थळी पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी अद्याप गुंडाच्या मृत्यूला दुजोरा दिलेला नाही. गोळीबारातील जखमींना उपचारासाठी ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. आमच्याकडे आतापर्यंत कोणतीही माहिती नाही, असे लखनऊच्या डीसीपींनी सांगतिले.

एका खटल्याच्या सुनावणीसाठी संजीव जीवाला न्यायालयात आणले होते

संजीव जीवा हा मुख्तार अंसारी आणि मुन्ना बंजरंगी गँगशी संबंधित होता. आमदार कृष्णानंद राय आणि ब्रम्हदत्त द्विवेदी यांच्या हत्या प्रकरणात संजीव जीवाचे नाव जोडले होते. मात्र कृष्णानंद राय हत्या प्रकरणात त्याला क्लिनचीट मिळाली होती. मात्र संजीव जीवा हा पश्चिम यूपीतील कुप्रसिद्ध गुन्हेगार आहे. त्याला काही दिवसांपासून लखनऊमधील तुरुंगात ठेवण्यात आले होते. तेथून त्याला एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी लखनऊ दिवाणी न्यायालयात आणण्यात आले होते. मुन्ना बजरंगीच्या हत्येनंतर संजीव जीवाने आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हटले होते.