
मुंबईत विविध ठिकाणी असलेले कबूतरखाने बंद करण्याच्या मुद्यावरून सध्या चांगलाच वाद पेटला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिकेतर्फे कारवाई करत कबूतरखाने बंद करण्यात येत आहेत. मात्र यामुळे प्राणीप्रेमी आणि जैन समाजाचे नागरिक चांगलेच संतापले असून ही कारवाई बंद करण्याची मागणी केली जात आहे. हा मुद्दा तापलेला असतानाच आता मीरारोडमध्ये कबुतरांवरून पुन्हा रणकंदन झालं आहे. कबूतरांना दाणे टाकण्यास मनाई केल्याने नागरिकांवर हल्ला करण्यात आल्याची भयानक घटना समोर आली आहे. त्यामळे प्रचंड खळबळ माजली आहे. वृद्ध नागरिक व त्यांच्या मुलीला बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांकडून 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की काय घडलं ?
मिळालेल्या माहितानुसार, मीरारोडच्या ठाकूर मॉलजवळ असणाऱ्या डीबी ओझोन इमारतीत रविवारी हा भयानक प्रकार घडला. या इमारतीमध्ये महेंद्र पटेल हे (वय 69) वृद्ध गृहस्थ राहतात. रविवारी सकाळी पटेल हे दूध आणायला घराबाहेर पडले. ते घरी परत येत असताना, त्यांच्या शेजारच्या इमारतीमध्ये राहणारी आशा व्यास ही महिला तेथे कबूतरांना दाणे टाकत होती, ते पटेल यांना दिसलं. त्यानंतर पटेल यांनी व्यास यांना सांगितलं की कबूतरांना दाणे टाकू नका. मात्र त्यानंतर व्यास यांनी पटेल यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली.
आवाज, गोंधळ ऐकून पटेल यांची मुलगी प्रेमल ही खाली आली व त्यांनी आशा व्यास यांना जाब विचारला. ते पाहून व्यास यांच्या इमारतीत राहणारा सोमेश अग्निहोत्री हाँ दोन लोकांना घेऊन तिथे आला. आणि त्याने काहीह न पाहाता संतपाच्या भरात प्रेमल पटेल यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तर दुसऱ्या व्यक्तीने प्रेमल पटेल यांचा गळा दाबला. एकच गदारोल माजला. प्रेमल पटेल व त्याचे वडील अतिशय घाबरले, घडलेल्या घटनेचा त्यांना मोठा मानसिक धक्का बसला. या घटनेप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर काशीमीरा पोलिसांनी सोमेश अग्निहोत्री, आशा व्यास आणि आणखी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने दादर कबुतरखाना तसेच मुंबईतील इतर कबूतर खान्यांवर कारवाई केली आहे. तसेच कबूतरांना खाणे देण्यासही मनाई केली आहे. मात्र प्राणीप्रेमी व जैन समाजाच्या नागरिकांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला असून तो मागे घेण्याची मागणी केली जात आहे.