
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणात एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेला व्यक्ती कोण आहे? त्याला कुठून ताब्यात घेतलय? CCTV फुटेजमध्ये जो चेहरा दिसला, तो हाच आरोपी आहे का? या बद्दल अजून अधिकृत माहिती पोलिसांनी दिलेली नाही. थोड्याचवेळात पोलीस याची माहिती देतील. ताब्यात घेतलेला माणूस हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या हल्लेखोरासारखाच दिसत आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेच्या एकूण 35 टीम तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 15 पथके मुंबई गुन्हे शाखेची असून 20 पथके पोलिसांची आहेत.
हा मुख्य आरोपी निघाला, तर बऱ्याच गोष्टींची उकल होऊ शकते. सैफ अली खान-करीना कपूर हे जोडपं वांद्रयाच्या सतगुरु शरण इमारतीत 12 व्या मजल्यावर राहतं. सैफच्या घरात 12 व्या मजल्यापर्यंत चोर पोहोचलाच कसा? हा मुख्य प्रश्न आहे. सैफ अली खान आणि करीना कपूर हे क्वाड्रूप्लेक्स घरात राहतात. म्हणजे सैफच्या फ्लॅटच्या आत चार मजले आहेत. इतकं मोठ घर असूनही सैफच्या घराच्या आत आणि बाहेर एकही टेहळणी कॅमेरा नाहीय. यामुळे चोराने घरात घुसल्यानंतर आतमध्ये काय हालचाली केल्या हे समजू शकत नाहीय.
असे अनेक अनुत्तरित प्रश्न
सैफच्या घरात हा आरोपी कसा घुसला? घरात घुसण्याची त्याची काही टेक्निक होती का? किंवा सैफच्याच घरातल्या कुठल्या माणसाने त्याला मदत केली का? असे अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयिताची गुन्हे शाखेने चौकशी सुरु केली आहे. तपास अधिकाऱ्यांना सैफ आणि करीनाच्या घरच्या सुरक्षेबाबत अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. हल्ल्यानंतर तो चोर पाऱ्याच्या उतरुन गेला. त्यावेळी इमारतीत असलेल्या एका सीसीटीव्ही फुटेजमुळे त्याचा चेहरा समोर आला. सैफ अली खानवर गुरुवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास चोराने चाकू हल्ला केला. यात सैफ अली खान गंभीर जखमी झाला. त्याला वांद्रयाच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलय. सैफ अली खानवर काल दोन शस्त्रक्रिया झाल्या. आता त्याच्या प्रकृतीला धोका नाहीय.