चप्पल स्टँडमध्ये ठेवलेली चावी चोरली आणि घर लुटले… चलाख चोराला पोलिसांनी कशा ठोकल्या बेड्या ?

| Updated on: Mar 29, 2024 | 8:20 AM

खून, चोरी, दरोडे, घरफोडी... एक ना अनेक ..अशा कित्येक गुन्ह्यांच्या बातम्या रोजच्या रोज कानावर पडत असतात. बरं इथले चोरही खूपच हुशार, गुन्हा करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब आणि नंतर फरार होतात. यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भलतेच धास्तावले असून जीव मुठीत धरून जगत आहेत

चप्पल स्टँडमध्ये ठेवलेली चावी चोरली आणि घर लुटले... चलाख चोराला पोलिसांनी कशा ठोकल्या बेड्या ?
पुण्यात चोरीची एक विचित्र घटना घडली.
Follow us on

पुणे… विद्येचे माहेरघर अशी या शहराची ओळख. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये गुन्ह्यांच्या वाढत्या घटना पाहून शहराची ओळख वेगळी होत चालली आहे. खून, चोरी, दरोडे, घरफोडी… एक ना अनेक ..अशा कित्येक गुन्ह्यांच्या बातम्या रोजच्या रोज कानावर पडत असतात. बरं इथले चोरही खूपच हुशार, गुन्हा करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब आणि नंतर फरार होतात. यामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र भलतेच धास्तावले असून जीव मुठीत धरून जगत आहेत. याच पुण्यातून आता चोरीची एक घटना समोर आली आहे. एक बंद फ्लॅटमध्ये चोरी घडली. विशेष म्हणजे चोरट्याने त्या फ्लॅटच्या बाहेर असलेल्या चप्पल स्टँडमधून घराची चावी घेतली आणि बेधडकपणेचोरी करत लाखोंचा माल लंपास केला. अखेर पुणे पोलिसांनी त्याला अटक करून बेड्या ठोकल्या.

चप्पल स्टँडमधून चावी चोरली आणि घरावर मारला डल्ला

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज शंकर राऊत (रा. वाघोली) असे अटक करण्यात आलेल्या चोराचे नाव आहे. वाघोली-आव्हाळवाडी रोडवरील ब्लीथ आयकॉन सोसायटीत नीरज अंबादास येमुल ( वय 29 ) यांचा फ्लॅट आहे. ते घर बंद करून बाहेर जात असताना, त्यांनी फ्लॅटची चावी बाहेरच असलेल्या चप्पल स्टँडमधील एका बुटात ठेवली. याचा फायदा घेत आरोपी सुरजने चप्पल स्टँडमधून ती चावी हस्तगत केली आणि चावीच्या मदतीने घर उघडून तो आत शिरला. त्याने साडेदहा तोळ्याचे सोन्याचे दागिने, 36 तोळे चांदीचे दागिने व 15 हजारांची रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी फिर्यादी नीरज याने लोणीकंद पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली, त्याआधारे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक

याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी नीरज यांची सोसायटी व वाघोली परिसरातील विविध सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये त्यांना सूरजच्या संशयास्पद हालचाली आढळून आल्या. खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी सूरजचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. पोलीसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून लाखो रुपयांचे दागिने तसेच आयफोनसह चोरीचा इतर मालही हस्तगत करण्यात आला आहे. लोणीकंद पोलीस अधिक तपास करत आहेत.