
Crime News: महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेले उमर्टी गावातून धक्कादायक बातमी आली आहे. या गावातून जळगाव पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण झाले आहे. गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी पोलीस गेले होते. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले आहे. पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करुन त्याला मध्य प्रदेशच्या सीमेत नेण्यात आले आहे. आता यासंदर्भात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी यांनी मध्य प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला आहे. त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहे.
जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण झाले. चोपडा ग्रामीण पोलीस महाराष्ट्रातील उमर्टी गावात एका गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर गावातील काही जण पोलिसांवर धावून आले. त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले. त्या पोलीस कर्मचाऱ्याला काही जणांनी सिमेच्या पलीकडे मध्य प्रदेशातील उमर्टी गावात नेले.
पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्याला बंदूक लावून पोलीस कर्मचाऱ्याच अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर जळगाव पोलीस दलात खळबळ उडाली. पोलीस कर्मचारी व संबंधित गावात अवैध शस्त्र विक्री करणारे यांच्यात वाद झाल्यानंतर या वादात संबंधितांनी पोलीस कर्मचाऱ्याच अपहरण केल्याची माहिती मिळाली.
महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवर दोन उमर्टी गाव आहे. एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव सीमेच्या पलीकडे मध्य प्रदेशात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस अधिकारी उमर्टी गावाकडे रवाना झाले आहे. या बातमीला पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दुजोरा दिला आहे. पोलीस कर्मचारी याला सुखरूप मिळवण्यासाठी मध्य प्रदेश पोलिसांची संपर्क सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.