
अभिजित पोते, पुणे | 25 ऑक्टोबर 2023 : काही गोष्टी आपल्या हातात असतात. त्या गोष्टींना आपण योग्यपणे हाताळल्या तर सारं काही योग्य होतं. पण रागाच्या भरात आपण नको त्या गोष्टी करत बसलो तर अडचणी कमी होण्यापेक्षा आणखी जास्त वाढू शकतात. त्यामुळे कोणतंही कारण असलं तर रागावू नये. मन शांत ठेवावं. त्या अडचणीवर पर्याय कसा निघेल याबाबत विचार करावा. तसेच संयमाने सर्व गोष्टींना सामोरं जावं. आपण रागाच्या भरात संयम सोडून नको त्या गोष्टी करुन बसतो आणि नंतर आपल्यावरच पश्चात्तापाची वेळ येते. त्यामुळे संयमाने गोष्टी हातळायला हव्या. पण सध्या अनेकांमधला संयमच संपत चालला आहे. पुण्यात अशीच काहीशी घटना घडली. विशेष म्हणजे एका व्यक्तीचा संयम इतका संपला की त्याने थेट हवेत गोळीबार केला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात एक विचित्र आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. पिझ्झा डिलिव्हरी देण्यासाठी उशीर झाल्याने चिडलेल्या ग्राहकाने चक्क पिझ्झा डिलिव्हरी बॉयला मारहाण केली. तसेच रागात त्याने हवेत फायरिंग केल्याचा प्रकार समोर आलाय. पुण्याजवळील वाघोली परिसरात वाघेश्वर मंदिराजवळ हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चेतन वसंत पडवळ असे डिलिव्हरी बॉयला मारहाण करत फायरिंग करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
रोहित राजकुमार हुलसुरे हे वाघोली परिसरात असलेल्या एका पिझ्झा सेंटरमध्ये पिझ्झा डिलिव्हरी बॉयचे काम करतात. आरोपी चेतन पडवळ याने काल (24 ऑक्टोबर) रात्री उशिरा ऑनलाईन पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर टाकली होती. त्याची पिझ्झा डिलिव्हरीची ऑर्डर डिलिव्हरी बॉय रोहित हुलसुरे याने उशिरा पोहोचवल्यानंतर आरोपीने रोहितला मारहाण केली.
या महाराणीचा जाब विचारण्यासाठी पिझ्झा डिलिव्हरी केंद्रातील देवेंद्र राहुल आणि इतर त्याचे मित्र गेले असता आरोपीने या सर्वांना मारहाण केली. आरोपीने सर्वांना घाबरवण्यासाठी त्याच्या कारमधून एक पिस्टल काढून हवेत फायरिंग केली. त्यामुळे सर्वजण घाबरुन पळून गेले. या प्रकाराची तक्रार पोलिसात देण्यात आली आहे. या प्रकरणी आरोपी चेतन पडवळ याच्यावर लोणीकंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
पिझ्झा डिलिव्हरी बॉय हा त्याचं काम करतो. अनेकदा ऑर्डर जास्त असते. त्यामुळे त्याला कदाचित तुमची ऑर्डर पूर्ण करायला किंवा तुमच्यापर्यंत पोहोचायला उशिर होत असेल. तो तुमच्या घरापर्यंत डिलिव्हरी घेऊन येतो हा त्याच्या कामाचा भाग आहे. पण याचा अर्थ असा होत नाही की तो तुमचा गुलाम आहे. तो कंपनीची एक सर्विस देण्याच काम करतो. त्यामुळे त्याच्यावर रागावण, त्याला मारहाण करणं हे चुकीचं आहे. याउलट डिलिव्हरी बॉयचं आपल्याला अप्रूप वाटायला हवं की ते नेहमी आपल्याला सुविधा देण्यासाठी तत्पर असतात. पुण्यात डिलिव्हरी बॉयसोबत घडलेल्या घटनेवर सर्वसामान्यांकडून टीका केली जात आहे.