भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले; आत्महत्या, घातपात की अपघात?

| Updated on: Jan 24, 2023 | 6:33 PM

या सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. मयत कुटुंब बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मोहन पवार हे आपली पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडांसोबत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहत होते.

भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळले; आत्महत्या, घातपात की अपघात?
भीमा नदीत एकाच कुटुंबातील सात मृतदेह आढळले
Image Credit source: TV9
Follow us on

दौंड, पुणे : दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीच्या पात्रात टप्याटप्याने सात मृतदेह आढळल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नदी पात्रात मिळालेले सर्व मृतदेह हे एकाच कुटुंबातील असून, यामध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. ही आत्महत्या, अपघात की घातपात आहे याचा कसून तपास आता यवत पोलीस करीत आहेत. मृतदेहांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी भीमा नदी पात्रात घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने दौंड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. नदी पात्रात यवत पोलीस आणि पुणे महानगरपालिकेची रेस्क्यू टीम कडून शोध मोहीम सुरू होती.

टप्प्याटप्प्याने सापडले सात मृतदेह

भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारी रोजी एका महिलेचा, 20 जानेवारी रोजी पुरुषाचा, 21 जानेवारी रोजी महिलेचा, 22 जानेवारी रोजी पुन्हा एक महिलेचा आणि आज 24 जानेवारी रोजी तीन लहान मुलांचे असे गेल्या 4 दिवसात टप्प्याटप्प्याने सात मृतदेह आढळले.

मृतदेहांची ओळख पटवण्यास यश

या सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यास पोलिसांना यश आले आहे. मयत कुटुंब बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहेत. मोहन पवार हे आपली पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडांसोबत नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज गावात राहत होते. येथे मोलमजुरी करुन कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवत होते.

हे सुद्धा वाचा

सर्व मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी यवत येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. यापैकी चार मृतदेहाचे शवविच्छेदन झाले असून, त्यात पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. चारही मृतदेहावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नाहीत.

सदर घटनेच्या अनुषंगाने अकस्मात मयत नोंद करण्यात आलेले आहे. मात्र पोलीस या मृत्यूप्रकरणी नेमके काय कारण आहे याचा सखोल तपास करत आहेत.

मृतांची नावे

मोहन उत्तम पवार वय वर्षे 45 मूळ राहणार गाव खामगाव तालुका गेवराई जि. बीड. (पती)
संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार वय 45 वर्ष राहणार खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड (पत्नी)
राणी श्याम फलवरे वय 24 वर्ष राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद (विवाहित मुलगी)
श्याम पंडित फलवरे वय 28 वर्षे राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद(जावई)
रितेश उर्फ भैय्या श्याम फलवरे वय वर्ष सात राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद (नातू)
छोटू श्याम फलवरे वय वर्ष पाच राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद (नातू)
कृष्णा श्याम फलवरे वय वर्ष तीन राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद (नातू)