
शिक्षण घेतल्यानंतर त्याचा वापर रोजगारासाठी केला जातो. पदवी घेतल्यानंतर नोकरी करुन जीवनात स्थैर्य आणले जाते. परंतु पदवी घेतल्यानंतर केवळ मौजमजा करण्यासाठी कोणी चोरी करेल का? पुणे पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या एका आरोपीला पकडले आहे. पदवीधर असलेला हा आरोपी केवळ मौजमजा करण्यासाठी मोटारसायकलींची चोरी करुन विक्री करत होता.
पुण्यात मौजमजा करण्याकरीता महागड्या मोटर सायकली चोरी करुन त्या ऑनलाईन फंडा वापरुन विक्री करणाऱ्या महादेव शिवाजी गरड (वय २६) याला अटक केली आहे. पुणे पोलिस गुन्हे शाखा युनिट पाचने त्याला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून होंडा सी.बी.शाईन मोटर सायकल (MH-१५/GH/९१४८ व युनिकॉर्न मोटर सायकल (MH-११/CT/२९१४) जप्त करण्यात आल्या. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखीन काही होंडा कंपनीच्या युनिकॉर्न मोटर सायकल चोरल्याचे म्हटले आहे.
शिवाजी गरड चोरी केलेल्या मोटारसायकली फेसबूकमधील Marketplace वरुन विकत होता. मोटर सायकलचे हफ्ते थकल्याने फायनान्स कंपनी गाडी जप्त करणार असल्याचे तो लोकांना सांगत होता. खोटी कारणे सांगून त्याने मोटारसायकली विकल्या. त्याने १२ युनिकॉर्न मोटर सायकल व त्याच्या ताब्यातील २ मोटर सायकल अशा एकूण १४ दुचाकी वाहने चोरले. हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतील ६, काळेपडळ पोलीस स्टेशन भागातील तीन, चिखली पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनकडील दोन तर सांगवी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन कडील तीन असे एकूण १४ वाहने चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.
पुण्यातील हडपसर परिसरातून मोठा अंमली साठा पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने छापेमारी करत ८ लाख रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत पुण्यात गांजा तस्करी करणाऱ्या ४ आरोपींना अटक केली. हे आरोपी राजस्थानमधून पुण्यात तस्करी करत होते. राकेश अर्जुनदास रामावत, ताराचंद सिताराम जहांगीर, मुसीम सलीम शेख, महेश नारायण कळसे अशी त्यांची नावे आहेत.