दारु भट्टी चालकांना पाठलाग करुन हुसकावलं, गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात महिला सरपंचांची कामगिरी

| Updated on: Aug 17, 2021 | 9:04 AM

गावचे पोलिस पाटील यांच्यापासून जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यापर्यंत सर्वांकडे तक्रार करुन झाली. तब्बल पाच वर्षे तक्रार करुनही गावठी दारुची भट्टी बंद झाली नाही.

दारु भट्टी चालकांना पाठलाग करुन हुसकावलं, गृहमंत्र्यांच्या मतदारसंघातील गावात महिला सरपंचांची कामगिरी
पुण्यातील करंदी गावात दारुची भट्टी केली उद्ध्वस्त
Follow us on

पिंपरी चिंचवड : पोलीस अधीक्षकांपर्यंत तक्रार करुनही गावठी दारुची भट्टी बंद झाली नाही, अखेर महिला सरपंचासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत दारु भट्टी उद्ध्वस्त केली. पुण्यामध्ये गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदारसंघात येणाऱ्या करंदी गावात हा प्रकार घडला.

काय आहे प्रकरण?

गावचे पोलिस पाटील यांच्यापासून जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यापर्यंत सर्वांकडे तक्रार करुन झाली. तब्बल पाच वर्षे तक्रार करुनही गावठी दारुची भट्टी बंद झाली नाही. त्यामुळे अखेर महिला सरपंच, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येत दारु भट्टी उद्ध्वस्त केली. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील करंदी गावातील ही घटना आहे.

आढळरावांनी दत्तक घेतलेलं गाव

दारुची भट्टी चालवणाऱ्यांना सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी अक्षरश: पाठलाग करुन हुसकावून लावलं. करंदी गाव हे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या मतदार संघात येते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी हे गाव दत्तक घेतलेले आहे.

अहमदनगरमध्ये दारु विक्री सोडून चहाचे हॉटेल

दुसरीकडे, अहमदनगरमधील कर्जतच्या पोलीस निरीक्षकामुळे एका दारु विक्रेत्याचे मन परिवर्तन झाले. त्यामुळे त्याने दारु विक्री सोडून चक्क चहाचे हॉटेल सुरु केले आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी ही किमया केली. कर्जत शहरातील बाळासाहेब माने हे अवैध दारु विक्री करत होते. ‘तुम्ही अवैध धंदे करू नका’ अशी समज वेळोवेळी पोलिसांनी त्यांना दिली. चांगला सन्मानजनक व्यवसाय करा, मी आवश्यकतेनुसार तुम्हाला मदत करेन, असे आश्वासन यादवांनी दिल्याने मानेंनी दारु विक्रीचा व्यवसाय सोडून चहाचे हॉटेल उघडले.

रक्षाबंधनाला बहिणींकडून भावाचा दारुचा गुत्ता उद्ध्वस्त

दरम्यान, गावातील अवैध दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. लहान मुलेही दारूच्या आहारी गेली आहेत. त्यामुळे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर दोघी बहिणींनी गावातील अवैध दारू बंद करायची, असा निश्चय केला. दोन्ही बहिणींनी एकत्र येऊन भाऊ प्रकाश चव्हाण यांचा दारुचा अड्डा उद्ध्वस्त केला. गेल्या वर्षी बुलडाण्यात ही घटना समोर आली होती.

संबंधित बातम्या :

पोलीस निरीक्षकामुळे अवैध दारु विक्रेत्याचे हृदय परिवर्तन, मद्यविक्री सोडून चहाचं हॉटेल सुरु

रक्षाबंधनादिवशी रणरागिणीचे रुप, बहिणींकडून भावाचा अवैध दारुचा व्यवसाय उद्ध्वस्त

गावातील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी महिलांचं अनोखं आंदोलन, भरवला दारुविक्रीचा बाजार!